Join us

दिव्यांका त्रिपाठीला १२ लाखांना गंडवलं, पैसे घेऊन पळून गेलेला CA; म्हणाली- "त्याने ४ चेकवर सह्या घेतल्या आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:51 IST

एका मुलाखतीत दिव्यांकाने तिच्याबरोबर घडलेल्या स्कॅमचा प्रसंग सांगितला. एका CA ने तिला १२ लाख रुपयांचा गंडा घातला होता.

'ये हे मोहोब्बतें' या मालिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी घराघरात पोहोचली. हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली दिव्यांका ओटीटीवर पदार्पण करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिव्यांकाने तिच्याबरोबर घडलेल्या स्कॅमचा प्रसंग सांगितला. एका CA ने तिला १२ लाख रुपयांचा गंडा घातला होता. 

दिव्यांकाने नुकतीच 'हिंदी रश'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, " बनूं मैं तेरी दुल्हन ही माझी पहिली सिरियल होती. त्या सेटवर एक CA होता जो काही कलाकारांचे अकाऊंट बघायचा. हा त्यावेळचा स्कॅम होता. आणि माझ्याबरोबर तेव्हा हे घडलं होतं. दोन वर्ष त्यांनी व्यवस्थित काम केलं. मी २०-२४ तास काम करायचे त्यामुळे दुसरा CA शोधण्यासाठी वेळ नव्हता. ते दुसऱ्या शहरात राहायचे. त्यांनी माझ्याकडून काही FD बनवून घेतल्या होत्या. ते म्हणाले होते की तुम्ही तर काही खर्च करत नाही. मग, तुमच्या टॅक्सच काय होईल? वेळ नसल्यामुळे आणि ऑनलाईनचा जमाना नसल्यामुळे तेव्हा खर्चही होत नव्हता. २-३ कपड्यांमध्ये काम चालून जायचं कारण, सेटवर गेल्यावर त्यांचेच कपडे घालायला लागायचे". 

पुढे ती म्हणाली, "त्यांनी FD बनवून माझ्याकडून चार चेकवर सह्या घेतल्या होत्या. त्याशिवाय काही फॉर्मही भरुन घेतले होते. ज्यावर माझं नाव होतं आणि खाली बँकचं नाव होतं. पण, बाकीचे पेज रिकामे होते. त्यांनी मला सांगितलं की मी ते भरेन तुम्ही काळजी करू नका. मी २-३ ठिकाणी माझं नाव टाकलं, सही केली. पण, त्यानंतर तो १२ लाख रुपये घेऊन गायब झाला. त्यावेळेस मी कमी कमवायचे. २ वर्षांत जेवढे कमवले होते त्यातले १२ लाख रुपये घेऊन तो गायब झाला होता. मी त्याला फोन केले पण काही उपयोग झाला नाही". 

"त्यानंतर मी खूप प्रयत्न करून माझ्या एका मित्राला त्याच्या शहरात पाठवलं. आणि त्याच्याकडून ४ चेक सही करून घेतले. पण, त्यातले ३ चेक बाऊन्स झाले. त्यामुळे माझं ९ लाखांचं नुकसान झालं. मी चेक बाऊन्स झाल्याची तक्रारही केली होती. मात्र फक्त तारीख पे तारीख मिळाली. मी शूटिंगमध्ये असल्यामुळे भोपाळवरुन वडिलांना यावं लागायचं. पण, माझा वकीलच विकला गेला होता. त्याने एक दिवस फोन करून मला सांगितलं की तुमची फाईल गायब झाली आहे. शेवटी आम्ही हार मानली. त्यामुळे नंतर पैशांसाठी मला छोट्या जाहिराती कराव्या लागल्या", असंही दिव्यांका म्हणाली.  

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीटिव्ही कलाकार