Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रीने माधुरीला ठरवलं होतं 'अशुभ', दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा खुलासा; स्टार बनल्यानंतर ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:50 IST

'मी तिला साईन केलं तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढलं', इंद्र कुमार यांचा खुलासा

बॉलिवूडमध्ये 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). 'खलनायक','तेजाब','साजन','हम आपके है कौन','बेटा' असा एकामागोमाग सुपरहिट सिनेमांमुळे ती चर्चेत आली. तसंच माधुरीच्या नृत्यकौशल्याचं विशेष कौतुक झालं. तिच्या स्माईलवर तर जग फिदा झालं होतं. मात्र यश मिळण्याच्या आधी याच माधुरीला इंडस्ट्रीने 'अशुभ'ही ठरवलं होतं असा खुलासा दिग्दर्शक इंद्र कुमार यांनीच नुकताच केला.

८० च्या दशकात माधुरी दीक्षितने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सुरुवातीला तिचे कोणतेच चित्रपट चालत नव्हते. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक इंद्र कुमार म्हणाले, "माधुरीचे सुरुवातीला एकही सिनेमे चालत नव्हते. तिला 'अशुभ' बोललं गेलं होतं. एका आर्टिकल मध्ये माधुरी अशुभ आहे असं छापूनही आलं होतं. मी 'बेटा' आणि 'दिल' या दोन्ही सिनेमांसाठी जेव्हा माधुरीला साईन केलं तेव्हा सगळे मला म्हणाले, 'वेडा झालाय का तू?' हिचा एकही सिनेमा चालत नाही. ज्या सिनेमात असते तो फ्लॉप होतो."

ते पुढे म्हणाले, "तरी मी १९८८ मध्ये 'दिल' आणि 'बेटा' दोन्ही चित्रपट माधुरीलाच घेऊन सुरु केले. कारण मला कुठेतरी तिच्यावर विश्वास होता. तिच्यात काहीतरी टॅलेंट नक्कीच आहे असंच मला वाटत होतं. त्यानंतर मीही नशीबवानच ठरलो. ऑक्टोबरमध्ये मी सिनेमाला सुरुवात केली आणि डिसेंबरमध्ये 'तेजाब' आला. जानेवारी १९८९ मध्ये 'राम लखन' आली. त्यामुळे लोकांचा माधुरीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. यानंतर माझ्या सिनेमाचं शेड्युल थेट मार्च महिन्यात उटीमध्ये होतं. तिथे जेव्हा माधुरी आली तेव्हा ती 'स्टार' बनूनच आली. तरी तिला कोणताच गर्व नव्हता. जशी ती पहिल्या दिवशी होती तशीच स्टार बनल्यानंतर होती आणि आजही तशीच आहे. मी अनेकांचे रंग बदलताना पाहिले आहेत पण माधुरीसारखं मी कोणालाच बघितलं नाही."

टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूड