Join us

VIDEO : 'हजारों जवाबों से मेरी खामोशी...' दिलजीतने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 11:25 IST

दिलजीत दोसांझनंं डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Diljit Dosanjh Tribute To Dr Manmohan Sing : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं २६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल देशातील सर्व बड्या स्टार्सनी दुःख व्यक्त केलं आहे. गायक दिलजीत दोसांझनेही कॉन्सर्टमध्ये मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

दिलजीत दोसांझ हा सध्या 'दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४' (Dil-Luminati Tour) कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. भारताच्या विविध शहरांत हे कॉन्सर्ट होत आहेत. नुकतंच दिलजीतचा आसाममधील गुवाहाटीमध्ये कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्टेजवर येताच दिलजीत दोसांझनंं  डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.

तो म्हणाला, "आजची मैफील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे आहे. मनमोहन सिंग हे अतिशय साधे जीवन जगले. कोणी त्यांच्याबद्दल वाईट बोलले तरी त्यांनी कधी सूड उगवला नाही. खरं तर राजकारणातील सर्वात कठीण काम म्हणजे अशा गोष्ट टाळणे. तुम्ही लोकसभेचे सत्र पाहिले आहे का? तिथे राजकारणी शाळेतल्या मुलांसारखे भांडतात. पण, डॉ. मनमोहन सिंग यांनी कधीही कोणाला प्रतिवाद केला नाही. त्यांच्या जीवनातून आपण हे शिकले पाहिजे".

 माजी पंतप्रधानांची आठवण काढताना दिलजीतनं मनमोहन सिंग यांचा "हजारों जवाबों से मेरी खामोशी अच्छी, न जाने कितने सवालों की आबरू रखी है" हा शेर सादर केला. दिलजीत म्हणाला, "कोणी कितीही वाईट बोलले, कोणी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तरी तुमचे ध्येय स्पष्ट असले पाहिजे. तुम्ही तुमच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मनमोहन सिंग हे पहिले शीख होते, ज्यांची स्वाक्षरी भारतीय चलनावर होती. ज्या पैशाच्या मागे सारे जग धावत आहे, त्यावर त्यांची सही होती, ही मोठी गोष्ट आहे. इथपर्यंत पोहोचणे ही सोपी गोष्ट नाही. आज आपण अशा व्यक्तीला नमन करत आहोत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले. मी डॉ. मनमोहन सिंग यांना पुन्हा विनम्र अभिवादन करतो".

टॅग्स :दिलजीत दोसांझडॉ. मनमोहन सिंग