'तारक मेहता का उलटा चष्मा' (tarak mehta ka ooltah chashmah) ही मालिका सर्वांच्या पसंतीची. आजही ही मालिका टीआरपीच्या शिखरावर आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका सब टीव्हीवर सुरु आहे. इतकंच नव्हे तर अनेकजण जेवताना 'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील मालिकेचा एखादा एपिसोड आवर्जून बघतात. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील अनेक संवाद चांगलेच गाजले. यापैकी एक संवाद म्हणजे "ए पागल औरत". पण याच संवादमुळे 'तारक मेहता..'मधील 'जेठालाल'ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी अडचणीत सापडले होते.कॉमेडियन सौरभ पंत यांच्या पॉडकास्टमध्ये दिलीप जोशींनी याविषयी खुलासा केला. ते म्हणाले की, "ए पागल औरत या डायलॉगमुळे मी अडचणीत आलेलो. खरंतर हा संवाद स्क्रीप्टमध्ये नव्हता. परंतु सीनच्या वेळेस इंप्रोवाईज करताना ए पागल औरत हा संवाद मी म्हटला. हा संवाद चांगलाच गाजला. परंतु काही लोकांनी यावर आक्षेप घेतला. महिलांसाठी हा संवाद अपमानास्पद आहे असं सांगण्यात आलं. त्या काळात वुमन लिब.. नावाची काहीतरी चळवळ सुरु होती. तुम्ही हा डायलॉग यापुढे म्हणणार नाही, असं मला सांगण्यात आलं. पुढे निर्मात्यांनी या संवादावर पूर्ण बंदी आणली." अशाप्रकारे दिलीप जोशींनी खुलासा केला. दिलीप जोशी गेली अनेक वर्ष कोणताही खंड पडू न देता 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत दिलीप जोशी साकारत असलेल्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. लहानांंपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची ही भूमिका फेव्हरेट आहे. दिलीप जोशी यांनी अनेक बॉलिवूड सिनेमा आणि गुजराती नाटकांमध्येही काम केलंय.
"ए पागल औरत" बोलल्याने 'तारक मेहता..'मधील 'जेठालाल' आलेला अडचणीत; अभिनेत्याचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:47 IST