कोविडमध्ये सिनेसृष्टीतील अनेक सिनेमांचं शूटिंग लांबणीवर गेलं. काही सिनेमांचं शूटिंग रद्दही झालं. इतकंच नव्हे जे सिनेमे रिलीज होणार होते त्यांचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. याचा फटका मनोज वाजपेयींच्या एका सिनेमालाही बसला. मनोज वाजपेयींचा कोविडमुळे रखडलेला सिनेमा अखेर रिलीज होणार आहे. Despatch असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज झालाय.
Despatch चा ट्रेलर रिलीज
मनोज वाजपेयींच्या आगामी Despatch सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसतात. त्यांच्या हाती एका आर्थिक घोटाळ्याची मोठी बातमी लागते. परंतु या घोटाळ्यामागे जी माणसं असतात ती मनोज यांना त्रास देतात. या भ्रष्टाचारी माणसांचा मनोज पर्दाफाश करणार का? हे ट्रेलरमधून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मनोज वाजपेयींचा जबरदस्त अभिनय आपल्याला दिसून येतो. अभिनेत्याच्या चाहत्यांनी Despatch च्या ट्रेलरला चांगलीच पसंती दिलीय.
Despatch कधी आणि कुठे बघायला मिळेल?
मनोज वाजपेयींची प्रमुख भूमिका असलेला Despatch हा सिनेमा थिएटरमध्ये नव्हे तर ओटीटीवर रिलीज होणार आहे. कोविडमुळे हा सिनेमा रखडला होता. अखेर अनेक अडचणींवर मात करुन Despatch सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. १३ डिसेंबरला Zee5 वर सिनेमाचा प्रीमियर होणार आहे. या सिनेमात मनोज वाजपेयींसोबत शहाना गोस्वामी, अर्चिता अग्रवाल, रितूपर्ण सेन या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. कनू बहल यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.