Join us
Daily Top 2Weekly Top 5

कास्टिंग काउचमुळे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतलेला इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय, म्हणाली- "भूमिका गमावल्या, कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:51 IST

"घराच्या बाहेर पडायची भीती...", कास्टिंग काऊचमुळे अभिनेत्रीने घेतलेला इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय, म्हणाली- "भूमिका गमावल्या..."

Surveen Chawla : मनोरंजनविश्वात एकदा की हाती चांगली कामं मिळू  लागली की आपसूकच पैसा आणि प्रसिद्धी मिळते. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी असंख्य स्वप्ने उराशी बाळगून अभिनय क्षेत्रात नशीब अजमावतात. या प्रवासात काहींना यश मिळत तर काहींच्या पदरी निराशा येते. परंतु, या झगमगत्या विश्वाचं वास्तव फार भीषण आहे. अनेकांना या क्षेत्रात चांगल्या-वाईट प्रसंगाना सामोरं जावं लागलं आहे. आजही सिनेसृष्टीत कास्टिंग काऊचसारखे प्रकार समोर येतात. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला (surveen chawla) कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. 

अभिनेत्री सुरवीन चावलाने 'सिद्धार्थ कन्नन' ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचं उघडपणे सांगितलं. ती म्हणाली, "एक काळ असा होता जेव्हा इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच हा प्रकार इतका वाढला होता की त्यामुळे कोणावर विश्वास बसत नव्हता, अशी परिस्थिती होती. त्या काळात माझी अवस्था अशी झाली होती की मला घराबाहेर पडायलाही भीती वाटायची. हे सगळं खूपच घृणास्पद होतं. मग पुढे अभिनेत्री म्हणाली," या सगळ्या प्रकारामुळे मला इंडस्ट्री सोडून निघून जावं असं वाटत होतं. आता मला हे सर्व करायचं नाही, असे विचार मनात यायचे. मी तत्वांशी एकनिष्ठ राहिले त्यामुळे माझ्या हातून अनेक भूमिका निसटल्या. पण, तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि भयानक काळ होता."

दिग्दर्शकाने किस करण्याचा प्रयत्न केला अन्...

सुरवीन चावलाने एका मुलाखतीत कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता. सुरवीन म्हणाली,  "मी अनेकदा कास्टिंग काउचचा अनुभव घेतला आहे. मी तुम्हाला मुंबईतील वीरा देसाई रोडमध्ये घडणारी घटना सांगते. एका दिग्दर्शकाने मला त्याच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलावलं होतं. मीटिंग झाल्यावर दिग्दर्शक मला गेटवर सोडण्यासाठी आला. माझं तेव्हा लग्न झालं होतं. आम्ही मीटिंगमध्ये माझ्या पतीबद्दलही चर्चा केली. मी जेव्हा दरवाजावर त्याला निरोप देण्यासाठी आली तेव्हा मला किस करण्यासाठी दिग्दर्शक थोडा खाली वाकला. त्यामुळे मला त्याला जोरात मागे ढकलावं लागलं."

वर्कफ्रंट

सुरवीन चावलाने तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीमधून केली. तिने 'कहीं तो होगा' आणि 'कसौटी जिंदगी की' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यानंतर, अभिनेत्रीने चित्रपटांकडे मोर्चा वळवला आणि २०११ मध्ये ती 'धरती' या पंजाबी चित्रपटात झळकली. मात्र, 'हेट स्टोरी २' मधून तिला खरी ओळख मिळाली. अलिकडेच, सुरवीन पंकज त्रिपाठी स्टारर 'क्रिमिनल जस्टिस ४' मध्ये दिसली होती आणि आता लवकरच ती 'मंडला मर्डर्स' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :सुरवीन चावलाबॉलिवूडसेलिब्रिटी