Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताली-थाली नहीं कुछ सॉलिड दो...! या अभिनेत्रीने पुन्हा एकदा पीएम मोदींना दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 16:37 IST

मोदींवर निशाणा साधत दिला सल्ला

कोरोना व्हायरसचा प्रकोप टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली या काही राज्यांत संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. यापूर्वी 22 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहल केले होते. शिवाय याच दिवशी आपआपल्या बाल्कनीत उभे होऊन टाळ्या वाजवून, थाळींचा नाद करून कोरोनाशी लढणा-यांचे आभार व्यक्त करा, असे आवाहनही केले होते. मोदींच्या या आवाहनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तथापि बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने मोदींच्या या आवाहनावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या अभिनेत्रीचे नाव होते पूजा बेदी. आता पूजाने पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधत, त्यांना एक सल्ला दिला आहे.

होय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. नेमक्या यावर पूजाने ट्विट केले़ ‘आज रात्री 8 वाजता पीएम आपल्याला संबोधित करणार आहेत. मी आशा करते की, आपल्या भाषणात ते टाळ्या व थाळ्या वाजवण्याचे न सांगता काही ठोस उपाय सुचवतील. उदाहरणार्थ लॉकडाऊन प्रोटोकॉल, आर्थिक मदतीचे पॅकेज, आरोग्य सुविधा, कर कपात करत उद्योगपतींना दिलासा...’ असे पूजा बेदीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या या पोस्टसोबत पूजा बेदीने एक फोटोही जोडला आहे. त्यावर, मित्रों असे लिहिले आहे.

सध्या पूजाच्या या ट्विटवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी पूजाचे समर्थन केले आहे तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे.याआधीही जनता कर्फ्यूच्या निमित्ताने पूजा बेदीने अप्रत्यक्षपणे मोदींना लक्ष्य केले होते. ‘भारताला (थाळ्या वाजवण्याशिवाय) कोरोना व्हायरसमुळे होणा-या आर्थिक संकटाशी कसे निपटता येईल, हे कळण्याची गरज आहे. निर्मला सीतारमन तोडगा काढा, लोकांना काही ठोस योजना द्या,’ असे खोचक ट्विट तिने केले होते. तिचे हे ट्विटही प्रचंड व्हायरल झाले होते.

टॅग्स :पूजा बेदीकोरोना वायरस बातम्यानरेंद्र मोदी