काल (२६ डिसेंबर) भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशातील सामान्य माणसापासून राजकीय व्यक्तींपर्यंत शोक व्यक्त करत आहेत. मनमोहन सिंग यांच्या फुफुसात संसर्ग झाला होता. त्यांना एम्सच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. अशातच मनमोहन सिंग यांच्याविषयी कपिल शर्माने भावुक पोस्ट शेअर केलीय.
कपिल शर्माने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
कॉमेडियन कपिल शर्माने काही वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. त्या भेटीचा फोटो शेअर करुन कपिल शर्मा लिहितो, "आज भारताने एक चांगलं नेतृत्व गमावलंय. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला एक आकार दिला. याशिवाय सचोटी, नम्रता यांंचं प्रतीक असलेले मनमोहन सिंग यांनी प्रगतीचा आशावाद त्यांच्यामागे ठेवलाय. त्यांची दूरदृष्टी, समर्पण अशा गोष्टींनी देशाला बदललंय. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली डॉ. सिंग. तुमचं योगदान कधीच विसरता येणार नाही."
मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशात पोकळी
देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारं व्यक्तिमत्व डॉ. मनमोहन सिंग यांचं काल ९२ व्या वर्षी दुःखद निधन झालं. मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळाली. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थव्यवस्थेचा सरदार गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. मनमोहन सिंग यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील व सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल.