'स्टार प्रवाह' वरील 'मुरांबा' (Muramba) या लोकप्रिय मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. मालिकेने नुकतंच ११०० भागांचा टप्पा पार केला आहे. तसंच मालिका ७ वर्षांचा लीप घेणार आहे. अक्षय आणि रमाची लेकीची मालिकेत एन्ट्री झाली आहे. मालिकेच्या प्रोमोत शशांक केतकरसोबत ही चिमुकली दिसून येते. ही छोटी मुलगी कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेलच. या छोटीने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. कोण आहे ही?
'मुरांबा'मालिकेत अक्षय आणि रमामध्ये दुरावा आला आहे. यामुळेच त्यांची लेक आरोही ही अक्षयजवळ होती. तर रमा लेकीपासून दूर राहत होती. ७ वर्षांच्या लीपनंतर त्यांची लेक आरोहीची मालिकेत एन्ट्री झाली आहे. या चिमुकलीचं नाव आरंभी उबाळे (Aarambhi Ubale) असं आहे. गोड चेहरा, मोठे सोनेरी केस आणि तिच्या घाऱ्या डोळ्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. आरंभीने याआधीही मालिकांमध्ये कामं केली आहेत. सन मराठीवरील 'सावली होईन सुखाची'मध्ये ती बिट्टीच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिने हिंदीतील गाजलेल्या 'अनुपमा'मध्येही भूमिका साकारली आहे. 'गुम है किसी के प्यार मे'मध्येही ती दिसली होती. आरंभीने जाहिराती आणि शॉट फिल्ममध्येही काम केलं आहे. तिला 'वन टेक आर्टिस्ट' असंही म्हणतात. एवढ्या लहान वयात तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
आरंभीला मुरांबा मालिकेत पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. तसंच ७ वर्षांनंतर मालिका नक्की कोणतं वळण घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आरोहीमुळे रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येतील असा अंदाज आहे. मात्र तो क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांना किती वाट बघावी लागणार हे येत्या एपिसोड्समधूनच कळेल.