Join us
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर मराठी अभिनेत्याचा नवा जावईशोध; शिवप्रेमी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 09:06 IST

रंजकता आली इतिहासाला कुठे तरी छेद मिळतो किंवा बाजूला टाकला जातो मग खरा इतिहास लोकांपर्यंत जात नाही असं सोलापूरकरांनी दावा केला आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीर आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन आग्र्याहून सुटले. पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत असं सांगत मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. एका मराठी युट्यूबला दिलेल्या मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही राहुल सोलापूरकर यांचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर?

मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला मुलाखत देताना अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले की, महाराज आग्र्याहून सुटले त्यावेळी पेटारे बिटारे काही नव्हते, चक्क लाच देऊन महाराज आलेत. त्यासाठी किती हुंडा वटवला त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आहे. मोहसिन खान की मोईन खान असं नाव आहे त्याच्याकडून अधिकृत शिक्के परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद ५ हत्ती घेऊन शेवटी निघाले, त्यांच्या परवान्याची खूणसुद्धा आहे. गोष्टी रुपात करताना मग ते लोकांना जरा रंजक करून सांगावे लागते. रंजकता आली इतिहासाला कुठे तरी छेद मिळतो किंवा बाजूला टाकला जातो मग खरा इतिहास लोकांपर्यंत जात नाही असं सोलापूरकरांनी दावा केला आहे.

इतकेच नाही तर गोष्टी रुपात अनेक कथा शिकवल्या जातात. महाराजांच्या शिस्तीचे मोठेपण म्हणून रचलेली स्टारी म्हणजे गडाचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद व्हायचे, याचातून निर्माण झालेली कथा हिरकणी आहे. हिरकणी घडलेलीच नाही. मी रायगडावर फिल्म केलीय हिरकणी असं काही नाही. असा इतिहासच नाही पण ते लिहिले गेले. गोष्टी रुपातला इतिहास आपण पुढे मांडायचा प्रयत्न करतो. रंजकतेच्या नावाखाली खरा इतिहास आणि खरे शिवाजी समजत नाही असं त्यांनी म्हटलं. 

जितेंद्र आव्हाड यांनी लगावला टोला

दरम्यान, राहुल सोलापूरकर यांच्या विधानावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात जितेंद्र आव्हाडांनीही सोलापूरकरांच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजजितेंद्र आव्हाड