Join us

'लापता लेडीज'ने चोरली कथा? 'बुर्का सिटी'चा दिग्दर्शक म्हणाला- "मी सिनेमा पाहून दु:खी झालो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:29 IST

'लापता लेडीज' आणि 'बुर्का सिटी'ची कथा सेम असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता 'बुर्का सिटी'चे दिग्दर्शक फैब्रिस ब्रॅक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

किरण रावचं दिग्दर्शन असलेला 'लापता लेडीज' हा सिनेमा प्रचंड गाजला. सर्वत्र या सिनेमाचं आणि त्यातील कथेचं कौतुक केलं गेलं. भारताकडून यंदाच्या ऑस्कर नॉमिनेशनसाठीही हा सिनेमा पाठवण्यात आला होता. पण, आता 'लापता लेडीज' सिनेमाची कथा बुर्का सिटी या अरबी शॉर्ट फिल्मवरुन चोरली असल्याचा आरोप होत आहे. 'लापता लेडीज' आणि 'बुर्का सिटी'ची कथा सेम असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता 'बुर्का सिटी'चे दिग्दर्शक फैब्रिस ब्रॅक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'लापता लेडीज' सिनेमा पाहिल्यानंतर दु:खी आणि आश्चर्यचकित झाल्याचं बुर्का सिटीच्या दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. फैब्रिस ब्रॅक यांनी नुकतीच IFPला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'लापता लेडीज' पाहून नाराजी व्यक्त केली आहे. 

काय म्हणाले 'बुर्का सिटी'चे दिग्दर्शक? 

'लापता लेडीज' सिनेमाची कथा माझ्या शॉर्ट फिल्मसारखी आहे. यातही एक दयाळू, भोळा आणि प्रेम करणारा नवरा आहे. एक भ्रष्ट पोलीस अधिकारी आहे. घुंघटच्या सीनमध्येही साम्य असल्याचं आढळतं. सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये जो ट्विस्ट आहे. त्यातही जवळपास साम्य आहेत. जिथे आपल्याला समजतं की एका महिलेने जाणून बुजून पळण्याचा निर्णय घेतला. मी २०१७ मध्ये ही शॉर्ट फिल्म लिहिली होती. आणि २०१९मध्ये अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये ती दाखवण्यात आली होती. २०२०मध्ये ही शॉर्ट फिल्म कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवली गेली होती. 

'लापता लेडीज' पाहिल्यानंतर काय वाटलं? असं विचारल्यावर ते म्हणाले, "जेव्हा मला याबाबत माहीत झालं मला आश्चर्य वाटलं आणि मी दु:खीदेखील झालो. भारतात हा सिनेमा हिट ठरला आणि ऑस्करसाठीही शॉर्टलिस्ट करण्यात आला होता, हे समजल्यानंतर मी जास्त आश्चर्य वाटलं. बुर्का सिटीवर सिनेमा बनवायचा माझा विचार होता. यावर मी चर्चादेखील केली होती. पण, आता हे शक्य होईल का? मला 'लापता लेडीज'च्या मेकर्सशी बोलायचं आहे.

टॅग्स :किरण रावसिनेमा