प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर जुबीन गर्गच्या अचानक झालेल्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. शुक्रवारी(१९ सप्टेंबर) सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना गायकाचा मृत्यू झाला. तो फक्त ५२ वर्षांचा होता. जुबीनचं आसामी संगीत जगतात मोठं योगदान आहे. त्याच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अजून सावरलेले नाहीत. रविवारी(२१ सप्टेंबर) जुबीन गर्गचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी भारतात आणण्यात आलं.
जुबिन गर्गला शेवटचा निरोप देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गायकाच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या दिग्गज गायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने चाहते उपस्थित होते. त्याच्या चाहत्यांनी 'मायाबिनी रतीर बुकुट' हे आसामी गाणं गात जुबिन गर्गला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. या भावुक क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे. गुवाहाटी प्लसने दिलेल्या वृत्तानुसार निधनानंतर 'मायाबिनी रतीर बुकुट' हे माझं आवडतं गाणं गावं अशी इच्छा जुबिनने त्याच्या कॉन्सर्टमध्ये बोलून दाखवली होती. चाहत्यांनी एकत्र येत सिंगरची ही शेवटची इच्छाही पूर्ण केली आहे.
दरम्यान, 'गँगस्टर', 'क्रिश ३' , 'झूम बराबर झूम' सारख्या काही बॉलिवूड सिनेमांमध्ये जुबीनने पार्श्वगायन केलं होतं. जुबीन गर्गचं 'गँगस्टर' सिनेमातील 'या अली' हे गाणं गाजलं. तसंच 'क्रिश ३'मध्ये हृतिक रोशन, कंगना राणौतवर चित्रीत झालेलं 'दिल तु ही बता' हेही गाणं जुबीननेच गायलं होतं. तसंच सुनिधी चौहानसोबत त्याने 'झुम बराबर झुम' हे लोकप्रिय गाणंही गायलं.