Join us

Zeenat Aman यांच्या बोल्ड फोटोमागची गोष्ट, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, 'मला मानवी शरिराबाबत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 09:29 IST

Zeenat Aman : ७० च्या दशकात बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झीनत अमान अनेकांसाठी आदर्श आहेत. त्याकाळी जेव्हा ...

Zeenat Aman : ७० च्या दशकात बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झीनत अमान अनेकांसाठी आदर्श आहेत. त्याकाळी जेव्हा पुरुषप्पधान संस्कृती अधिक होती तेव्हा झीनत यांनी दाखवलेलं धाडस, त्यांचं बोल्ड आणि बिंधास्त व्यक्तिमत्व खूप प्रचलित होतं. केवळ सौंदर्यच नाही तर त्यांच्या अभिनयाचेही प्रेक्षक चाहते आहेत. झीनत अमान आज ७१ वर्षांच्या असून त्यांनी नुकतेच आपले इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून त्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. त्यांनी नकताच पोस्ट केलेला एक बोल्ड फोटो आणि त्यावर लिहिलेले कॅप्शन आता व्हायरल होत आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी 'सत्यम शिवम सुंदरम' या सिनेमासाठी दिलेल्या लुक टेस्टचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमागची नेमकी कहाणी काय हे त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे. झीनत अमान लिहितात, 'हा फोटो फोटोग्राफर जे पी सिंघल यांनी 1977 च्या सुमारास 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमाच्या लूक टेस्ट दरम्यान काढला होता.आर के स्टुडिओमध्ये या फोटोंची सीरिज शूट करण्यात आली. तर ही वेषभूषा ऑस्कर विजेते भानू अथैया यांनी डिझाइन केली होती.'

पुढे त्या लिहितात, 'बॉलिवूडच्या इतिहासाबद्दल माहित असलेल्यांना आठवत असेल की,  सत्यम शिवम सुंदरममधील माझ्या रूपा या व्यक्तिरेखेमुळे खूप वाद निर्माण झाला होता. या भूमिकेवर अश्‍लीलता पसरवण्याचा आरोप केला गेला. पण मला त्यात काहीच वावगे वाटले नाही कारण मानवी शरिराबद्दल अश्लील वाटण्यासारखे काहीच नाही. मी दिग्दर्शक जे सांगतील ते करणारी अभिनेत्री आहे. हा लूक करणं माझ्या कामाचा भाग होतं. रूपा या भूमिकेची मादकता हा सिनेमाच्या कथानकाचा मुख्य भाग नव्हता तर तो केवळ चित्रपटामधील एक भाग होता. प्रत्येक हालचाल ही डझनभर क्रू मेंबर्ससमोर दिग्दर्शित केली जाते आणि त्याचं सादरीकरण केलं जातं. त्याची तालीम केली जाते. 

'दिग्दर्शक राज कपूर यांनी मला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. पण माझ्या वेस्टर्न इमेजची देखील त्यांना काळजी वाटत होती.प्रेक्षक मला या  भूमिकेत स्वीकारतील की नाही याची त्यांना खात्री नव्हती. म्हणून त्यांनी माझी लूक टेस्ट घेतली. नंतर, या टेस्टच्या आधारे, आम्ही लताजींच्या 1956 च्या जगते रहो चित्रपटातील 'जागो मोहन प्यारे' या प्रसिद्ध गाण्यावर एक छोटा व्हिडीओ शूट केला. या व्हिडिओला कसा प्रतिसाद मिळतो हे बघण्यासाठी त्यांनी आर के स्टुडिओमध्ये स्क्रीनिंगही ठेवलं. पहिल्या स्क्रीनिंगनंतर या चित्रपटाचे सर्व राईट्स विकले गेले', असं झीनत अमान यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

झीनत अमान यांनी 'सत्यम शिवम सुंदरम' मध्ये साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. त्याकाळी अशा पद्धतीची बोल्ड भूमिका साकारणं नक्कीच धाडसाचं काम होतं. मात्र त्यांनी कोणत्याही आरोपांची पर्वा न करता उत्तम भूमिका साकारली. हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील महत्वाचा टप्पा होता.  

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी