दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरातून असंतोष उसळला होता. भारतीय लष्कराने त्यानंतर राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. तसेच भारताने सिंधू जल करारालाही स्थगिती दिली. पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही, अशी रोखठोक भूमिका भारताने घेतली होती. मात्र, १४ सप्टेंबर रोजी आशिया चषकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून आता पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे. त्याचवेळी, 'मैं हू ना' फेम जायेद खानने भारत-पाक सामन्याला पाठिंबा दिलाय.
'मैं हू ना' फेम जायेद खानने भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, "भारत इतर सर्वांना हरवेल. भारत एक उत्तम संघ आहे आणि मला वाटते की १०० टक्के भारत जिंकेल". भारताने पाकिस्तानशी खेळावे की नाही असे विचारले असता तो म्हणाला, "का नाही? खेळ हे खेळ असतात. त्यात मोठी गोष्ट काय आहे? तिथे जे काही छोटे संबंध निर्माण करता येतील, ते निर्माण होऊ द्या".
जायेद खान लवकरच डिजिटल डेब्यू करणार आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्टचे नाव 'द फिल्म दॅट नेव्हर वॉज' आहे. जायेद खानने २००३ मध्ये 'चुरा लिया है तुमने' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु त्याला खरी ओळख शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'मैं हूं ना' मधून मिळाली. त्यानंतर जायदने 'दस', 'शब्द', 'फाइट क्लब' आणि युवराज यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे जायेद खानने अभिनेत्यासोबतचं एक बिझनेसमन म्हणून ओळख निर्माण केली आहे.