Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिनाताईंची भूमिका साकारताना अमृता रावला होते 'या' गोष्टीचे दडपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 06:00 IST

अगदी विद्यार्थी दशेपासूनच मॉडेलिंगची सुरूवात आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारी अभिनेत्री अमृता राव आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.

ठळक मुद्देअमृता सध्या ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची भूमिका साकारतेयअमृताचा ‘विवाह’ सारखा सिल्वर जुबली चित्रपट मिळाला जो आजही लोकांच्या स्मरणात आहे

 रवींद्र मोरे 

अगदी विद्यार्थी दशेपासूनच मॉडेलिंगची सुरूवात आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारी अभिनेत्री अमृता राव आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाची दखल घेत अमृताला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अमृता सध्या ‘ठाकरे’  चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची भूमिका साकारत असून त्यांच्या  या भूमिकेबद्दल आणि आतापर्यंतच्या प्रवासाबाबत ‘लोकमत सीएनएक्स’ने  त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

* तुम्ही ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहात, ही भूमिका साकारताना काही दडपण वाटले का?

- प्रामााणिकपणे सांगायचे झाले तर, जर एक अभिनेत्री म्हणून विचार केला की, मी उद्धव ठाकरे यांची आई आणि आदित्य ठाकरे यांची आजीची भूमिका साकारत आहे, असे मी दडपण जर मी घेतले तर हे साकारणे शक्य नव्हते. माझ्यावर विशेष दडपण होते ते म्हणजे कोणत्याही संदर्भाशिवाय ही भूमिका साकारणे. कारण माझ्याकडे मिनाताई ठाकरे यांचा कोणताच संदर्भ नव्हता. ना ही इंटरनेटवर आणि ना ही मीडियाकडे. तर विना संदर्भ रिअल लाइफ एखाद्याची भूमिका साकारणे हे माझ्यावर जास्त दडपण होते. 

* ही भूमिका साकारताना तुम्हाला काय तयारी करावी लागली?

- या भूमिकेच्या तयारीसाठी सर्वप्रथम मला इंटरनेटवर बरीच माहिती शोधावी लागली, त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक मुलाखती पाहिल्या. मात्र त्यांनी कुठेच मिनाताईंचा उल्लेख केलेला आढळला नाही. कारण मिनाताई नेहमी मीडियापासून लांब राहिल्या आहेत. पण सुदैवाने मला बाळासाहेबांच्या बहिणीची मुलाखत मिळाली, ज्यात मिनाताईंच्या बाबतीत खूपच वर्णन होते. त्याच संदर्भावर मी तयारी करावी. शिवाय त्यांच्या फोटोंच्या माध्यमातूनही मी बरीच तयारी केली.

* अभिनय क्षेत्रच का करिअर बनविण्याचे ठरविले?

- अगदी लहानपणापासूनच मी ठरविले होते की, मला अभिनेत्री व्हायचंय. कारण मी श्रीदेवींचे चित्रपट खूपच पाहायची. तशी मी फारशी तयारी केली नव्हती, अ‍ॅक्टिंग क्लासेस वगैरे याची. मात्र कदाचित नशिबातच असेल आणि आपोआपच तसे घडत गेले आणि मी अभिनेत्री बनली. 

* इथपर्यंतचा प्रवास कसा राहिला?

- तशी मी या क्षेत्रात खूप नशिबवान ठरली. जसेही मी इंडस्ट्रीत पदार्पण केले तसे माझे सुरुवातीचे तीन चित्रपट सुपरहिट ठरले. त्यानंतरही मला ‘विवाह’ सारखा सिल्वर जुबली चित्रपट मिळाला जो आजही लोकांच्या स्मरणात आहे. पण मला नेहमी वाटायचे की, या इंडस्ट्रीत मला कोणी सिनीयर अ‍ॅक्टर्सचे मार्गदर्शन मिळावे, कारण एका न्यू कमर्सला या क्षेत्रात गरज पडतेच. मात्र एक सांगावेसे वाटते की, मी याठिकाणी जे काही मिळविले ते माझ्या हुशारीने आणि कौशल्याने मिळविले आहे. 

* या इंडस्ट्रीत सध्या नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आपण कोणत्या प्रकारच्या चित्रपटात काम करणे जास्त पसंत कराल?

- मी आजही पारिवारीक चित्रपटात काम करणे अधिक पसंत करेल, मग ते थ्रिलर असो वा हॉरर. शिवाय मी निगेटिव्ह भूमिकाही चांगल्या प्रकारे करु शकते, मात्र तो चित्रपट पारिवारीक असावा आणि तो कुटुंबाचा पाहण्यासारखा असावा. 

 

टॅग्स :ठाकरे सिनेमाअमृता राव