'पवित्रा रिश्ता' ही छोट्या पडद्यावरील अतिशय गाजलेली मालिका. या मालिकेतूनच अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांना प्रसिद्धी मिळाली. ही ऑनस्क्रिन जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात होती. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यात ब्रेकअप झालं. पण, सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला चाहत्यांनी दोष द्यायला सुरुवात केली होती. यावर तिने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. तिच्या मुलाखतीचा जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
काय म्हणाली होती अंकिता?
लोक म्हणायचे तू सुशांतला सोडलंस...हे तुम्ही कसं म्हणू शकता. कोणालाच माझी बाजू माहीत नव्हती. मला कोणालाही दोष द्यायचा नाही. पण, सुशांतने त्याचा मार्ग आधीच निवडला होता. त्याला त्याच्या करिअरकडे लक्ष द्यायचं होतं. त्याने त्याचं करिअर निवडलं आणि तो मुव्ह ऑन झाला. पण, जवळपास २ ते अडीच वर्ष मी यातून बाहेर पडले नव्हते. मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. मी काम करण्याच्याही मनस्थितीत नव्हते. लगेच मुव्ह ऑन करून कामावर लक्ष केंद्रित करेन अशी मुलगी मी नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी हे खूपच कठीण होतं.
पण, माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. माझं आयुष्य संपलं असं मला वाटत होतं. काय करायचं हे मला माहीत नव्हतं. मी तरीही कोणाला दोष देत नाहीये. त्याने त्याचा मार्ग निवडला. पण, मला प्रेम, काळजी घेणारं कोणीतरी हवं होतं. हे त्याचं आयुष्य आहे, त्यामुळे मी त्याला जाऊ दिलं. पण, त्यानंतर मी खूप कठीण प्रसंगातून गेले. आणि कुटुंबीयांमुळे मी यातून बाहेर पडू शकले. जेव्हा मला वाटलं की सगळं संपलं तिथूनच माझा नवा प्रवास सुरू झाला.
या मुलाखतीत अंकिताने सुशांतशी लग्न करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. अंकिता संजय लीला भन्साळींच्या बाजीराव मस्तानीची ऑफर होती. मात्र "मला लग्न करायचं आहे", असं म्हणून तिने हा सिनेमा नाकारला.