Ajay Devgn: बॉलिवूड स्टार अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २०१२ मध्ये आलेल्या 'सन ऑफ सरदार' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 'सन ऑफ सरदार २' येत्या १ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच आता अजय देवगनचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये अजय हा पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत दिसतोय. वर्ल्ड चॅम्पियन्स लीग २०२५ दरम्यान दोघांची भेट झाली का? प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, या वायरल फोटोंमागचं सत्य काहीसं वेगळंच आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स २०२५ (World Championship of Legends 2025) मध्ये भारत-पाक सामना रद्द झाल्यानंतर अजय देवगन आणि शाहिद आफ्रिदीच्या भेटीचा फोटो व्हायरल झालाय. या फोटोत दोघंही एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. या फोटोनं अनेक भारतीय नेटिझन्स आणि क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकीत केलं आहे. अनेकजण म्हणू लागले की, "भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरोधात बहिष्कार टाकलेला असताना अजय देवगणने मात्र शाहिद आफ्रिदीला भेटण्याचा निर्णय का घेतला?" यामुळे सोशल मीडियावर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली.
नेमकं काय आहे फोटोमागचं सत्य?हा फोटो सध्याच्या २०२५ WCL स्पर्धेतील नाही, तर २०२४ मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन्स लीग (World Championship of Legends 2024) फाइनल दरम्यानचा आहे. अजय देवगण त्या वर्षी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरातील एजबॅस्टन मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या फायनल मॅचसाठी उपस्थित होता. ही मॅच भारताने जिंकली होती आणि त्याच दिवशी अजय देवगण आणि शाहिद आफ्रिदी यांची भेट झाली होती.
भारत- पाकिस्तान सामना रद्द
इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स २०२५ स्पर्धेला जोरदार सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत जगभरातील ६ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरलेत. ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ते सर्व दिग्गज खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. काल या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स विरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स असा सामना होणार होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू आमनेसामने येणार होते. त्याआधी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यावरुन सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मात्र आयोजकांनी हा सामना रद्द (India Vs Pakistan Match Cancelled In Wcl 2025) करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.