Vikrant Massey: '१२वी फेल', 'द साबरमती रिपोर्ट' आणि 'सेक्शन ३६' सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयानं प्रभावित करणाऱ्या विक्रांत मेसीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अभिनेता लवकरच एका मोठ्या प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पठाण' आणि 'वॉर' सारखे उत्तम चित्रपट बनवणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या चित्रपटात हा विक्रांत मेसी मुख्य भूमिका साकारणार आहे.
विक्रांत मेसी हा गुरुदेव श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार आहे. महावीर जैन निर्मित आणि सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव 'व्हाइट' आहे. यामधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सिद्धार्थ आनंद आणि महावीर जैन यांच्यासोबत अभिनेत्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये विक्रांत जाड मिशा आणि लांब केसांसह दिसत आहे. विक्रांतनं गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची भेट सुद्धा घेतली आहे. त्यांची शारीरिक भाषा, हावभाव, सगळं विक्रांत आत्मसात करत आहेत.
'व्हाइट' चित्रपटात श्री श्री रविशंकर यांची जीवनावर आधारित खरी गोष्ट मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाची शुटिंग जुलैमध्ये सुरु होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह इंग्लिश, स्पॅनिश भाषेमध्ये सुद्धा बनणार आहे. कोलंबियात ५२ वर्षापासून सुरू असलेलं गृह युद्ध श्री श्री रविशंकर यांनी कसं मिटवलं हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २०२६ मध्ये प्रदर्शित होईल. आता 'व्हाईट' सिनेमामध्ये विक्रांत श्री श्री रविशंकर यांची भूमिका कशी साकारतोय, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.