Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्ट्रीट फायटर' ट्रेलरपूर्वी हॉलिवूडच्या मंचावर विद्युत जामवालचा मंत्रजप; जिंकली मने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 12:22 IST

'ॲक्शन मॅन'  विद्युत जामवाल आता थेट हॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करताना दिसत आहे.

बॉलिवूडचा खराखुरा 'ॲक्शन मॅन'  विद्युत जामवाल आता थेट हॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करताना दिसत आहे. त्याच्या बहुप्रतीक्षित 'स्ट्रीट फायटर' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, स्क्रीनिंगपूर्वी विद्युतच्या एका खास कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सिनेमाकॉनमध्ये उपस्थित प्रेक्षकांसमोर ट्रेलर दाखवण्यापूर्वी विद्युतनं सूर्य मंत्र, चंद्र मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप केल्याचं पाहायला मिळालं.

विद्युत जामवालने 'स्ट्रीट फायटर' या प्रसिद्ध आर्केड गेमवर आधारित चित्रपटात योगगुरू 'धल्सिम' (Dhalsim) ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारून जागतिक इतिहास रचला आहे. सिनेमाकॉनमधील खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी, विद्युतने हॉलिवूड अभिनेता नोहा सेंटिनिओ आणि इतर सहकलाकारांसोबत प्रार्थना केली.

हा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना विद्युतने अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणाला, "काही वैयक्तिक यश मला आयुष्याच्या उद्देशाची खोल जाणीव करून देतात. असे काही क्षण असतात जे मला जमिनीशी जोडून ठेवतात आणि मी कोण आहे याची आठवण करून देतात. असाच एक खास क्षण तो होता, जेव्हा मला लास वेगासमध्ये सिनेमाकॉनमध्ये प्रार्थना करण्याचं सौभाग्य मिळालं. जगातील सर्वात गजबजलेल्या आणि उत्साही ठिकाणांपैकी एक असलेल्या त्या ठिकाणी माझ्या भारतीय मंत्रांनी शांततेची एक लहर निर्माण केली. शांतता आणि समाधानाचा अनुभव दिला. त्या क्षणी मला तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीसोबत एक खोल बंध जाणवला. शब्दांच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, आपण सगळे एकत्र जोडले गेलो".

दरम्यान, किताओ साकुराई दिग्दर्शित या चित्रपटात जगातील दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. 'स्ट्रीट फायटर' भारतात १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडमधील ॲक्शन हिरोपासून हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या विद्युत जामवालसाठी हा सिनेमा एक मोठा टप्पा ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vidyut Jammwal's mantras resonate in Hollywood before 'Street Fighter' trailer.

Web Summary : Vidyut Jammwal made a powerful Hollywood entry with 'Street Fighter.' Before the trailer screening, he chanted Surya Mantra, Chandra Mantra, and Gayatri Mantra, captivating the audience. He plays Dhalsim in the movie, set to release on October 16, 2026.
टॅग्स :विद्युत जामवाल