Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vikrant Massey : "मला खूप मदत..."; विक्रांत मेस्सीने सांगितला स्मृती इराणींसोबतचा 'तो' किस्सा, झाला भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 18:36 IST

Vikrant Massey : विक्रांत मेस्सीने स्मृती इराणी यांच्यासोबत त्यांची पहिली भेट कधी आणि कशी झाली, त्यावेळचा किस्सा सांगितला आहे.

विक्रांत मेस्सीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 12th फेल या चित्रपटात या अभिनेत्याने अप्रतिम काम करून सर्वांची मनं जिंकली होती. विक्रांतला सातत्याने वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं जात आहे. पण सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत टिकून राहणं विक्रांतसाठी अजिबात सोपं नव्हतं. एका कार्यक्रमादरम्यान स्मृती इराणी यांच्याविषयी बोलताना अभिनेता भावूक झालेला दिसला. 

विक्रांतने स्मृती इराणी यांच्यासोबत त्यांची पहिली भेट कधी आणि कशी झाली, त्यावेळचा किस्सा सांगितला आहे. विक्रांत एका अवॉर्ड फंक्शनला गेला होता. यावेळी स्मृती इराणी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर विक्रांतने काही वर्षांपूर्वीचा काळ आठवला आणि एक किस्सा सांगितला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

अभिनेता म्हणाला की, "2006 साली एका मुलाने मला सांगितलं की, मॅडम तुम्हाला भेटू इच्छितात. त्या मॅडम स्मृती इराणी होत्या. मी मॅडमना भेटलो. त्या मला जास्त ओळखत नव्हत्या, पण त्यांनी माझे काही शो पाहिले होते. पहिल्या भेटीत स्मृती इराणींनी मला सांगितलं - 'तुझ्यात खूप क्षमता आहे.'"

"यानंतर दोघेही एकत्र बसलो. त्यांनी मला संध्याकाळचा नाश्ताही दिला. बराच वेळ बोलत होतो. जवळपास एका महिन्यानंतर एका प्रॉडक्शन हाऊसची ऑफर आली. त्यावेळी मला त्या कामाची खूप मदत झाली. काही वर्षांनी मला कळलं की स्मृती इराणी यांनी माझं नाव सुचवलं होतं."

हा किस्सा सांगताना अभिनेता खूपच भावूक दिसत होता. स्मृती इराणी यांच्याकडून पुरस्कार मिळणं ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे असंही त्याने सांगितलं. विक्रांत लवकरच 'द साबरमती रिपोर्ट'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट तीन मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात विक्रांतसोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

टॅग्स :विक्रांत मेसीस्मृती इराणीबॉलिवूड