'छावा' सिनेमाचा ट्रेलर काल रिलीज झाला. या ट्रेलर लाँचच्या वेळेस विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि सिनेमाचे इतर कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. 'छावा'मध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय. 'छावा'च्या ट्रेलरमध्ये विकी कौशलचा दमदार अभिनय दिसतोय. 'छावा'मध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली, याचा खुलासा त्याने केलाय.
'छावा'साठी विकी कौशलने घेतली मेहनत
विकी कौशलने खुलासा केला की त्याने 'छावा'साठी २५ किलो वजन वाढवलं. तो म्हणाला की, "मी उरी द सर्जिकल स्ट्राइक हा शेवटचा सिनेमा केला जो अॅक्शन सिनेमा होता. त्यानंतर मी अॅक्शन सिनेमा करण्याची संधी शोधत होतो. छावा निमित्ताने ही संधी मला मिळाली. माझ्यासाठी हा सर्व अनुभव नवीन होता. मला घोडेस्वारी येत नव्हती. त्यामुळे मी तलवारबाजी, घोडेस्वारी आणि भालायुद्ध या गोष्टींचं सहा महिने प्रशिक्षण घेतलं. याशिवाय माझं वजन मी वाढवलं. माझं वजन आधी ८० किलो होतं. ते १०५ किलो झालं."
विकी पुढे म्हणाला, "मी अनेक महिने ट्रेनिंग आणि अॅक्शन सीक्वेंसची तयारी केली. यासाठी आमचे अॅक्शन कोरिओग्राफर परवेज सर आणि त्यांच्या टीमने आम्हाला साथ दिली. टीझरमध्ये तुम्ही जी अॅक्शन पाहिली त्यासाठी दोन हजार लोक प्रचंड उन्हात शूट करत होते. याशिवाय तब्बल ५०० स्टंटमॅन सहभागी होते." अशाप्रकारे विकीने 'छावा'साठी किती मेहनत घेतली याचा खुलासा केलाय. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होतोय.