'डंकी' सिनेमा २०२३ साली रिलीज झाला. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमात नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या तरुणांची व्यथा बघायला मिळाली. सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला तरीही शाहरुखच्या चाहत्यांना मात्र हा सिनेमा आवडला. 'डंकी' सिनेमात काम केलेल्या एका अभिनेत्याची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समोर येतेय. या अभिनेत्याच्या मित्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचं आवाहन केलंय.
शाहरुखसोबत काम करणाऱ्या अभिनेत्याची प्रकृती गंभीर
शाहरुखच्या 'डंकी' सिनेमात काम करणारा अभिनेता वरुण कुलकर्णी सध्या किडनीसंबंधी गंभीर आजाराशी झुंज देत आहे. वरुणला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्याच्याकडे उपचारासाठी पैशांची कमतरता आहे. वरुणचा मित्र आणि अभिनेता रोशन शेट्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून वरुणला मदत करण्याचं आवाहन केलंय. वरुणचे हॉस्पिटलमधील फोटो शेअर करुन रोशनने पोस्ट लिहिलीय.
रोशन लिहितो की, "माझा मित्र आणि सह-अभिनेता वरुण कुलकर्णी सध्या किडनीसंबंधी गंभीर आजाराशी झुंज देतोय. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पैशांची जुळवाजुळव करतोय. परंतु खर्च वाढत चाललाय. २-३ वेळा डायलिसिस करावं लागतंय. वरुण केवळ एक उत्कृष्ट कलाकार नाही तर चांगला माणूसही आहे. त्याने अत्यंत कमी वयात त्याच्या आई-वडिलांना गमावलं. सध्या त्याला आर्थिक मदतीची गरज असून तुम्ही त्याच्या उपचारांसाठी डोनेट करावं अशी आपणास विनंती करतो." पुढे रोशनने मदत कशी पाठवायची याची पोस्टमध्ये माहिती सांगितली आहे. वरुणने याआधी 'स्कॅम १९९२' आणि 'फॅमिली मॅन' वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये काम केलंय.