Join us

'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:42 IST

कामावरील प्रेम आणि श्रद्धा यामुळेच पंकज त्रिपाठी आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. चाहतेही त्यांच्यावर भरभरुन प्रेम करतात. एक महिला खासदारही पंकज त्रिपाठी यांची चाहती आहे.

पंकज त्रिपाठी म्हणजे बॉलिवूडमधील अतिशय टॅलेंटेड, मेहनती आणि हरहुन्नरी अभिनेता. मिर्झापूर, क्रिमिनल जस्टिस, गँग्स ऑफ वासेपूर या वेब सीरिजमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. कधी गुंडाची तर कधी सामान्य माणसाची भूमिका साकारणारे पंकज त्रिपाठी प्रत्येक भूमिकेत त्यांच्या वेगळेपणाची छाप पाडतात. स्त्री, ओएमजी २, मिमी, कागज, मसान अशा कित्येक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली आहे. कामावरील प्रेम आणि श्रद्धा यामुळेच पंकज त्रिपाठी आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. चाहतेही त्यांच्यावर भरभरुन प्रेम करतात. एक महिला खासदारही पंकज त्रिपाठी यांची चाहती आहे. 

तृणमूल काँग्रेसच्या खासदार असलेल्या महुआ मोइत्रा यांना पंकज त्रिपाठींवर क्रश आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना महुआ म्हणाल्या, "मी मुन्नाभाई सिनेमाची सीरिज बघितली, मी ती अनेक वेळा पाहू शकते. विक्की डोनर सिनेमाही मला आवडला. मला पंकज त्रिपाठी आवडतात. मिर्झापूरचा प्रत्येक सीन मी निरखून बघितला आहे. ते सगळ्यात कूल अभिनेता आहेत असं मला वाटतं. मिर्झापूर आणि गँग्स ऑफ वासेपूरमध्ये त्यांच्या भूमिका मला आवडल्या. मला त्यांच्या निगेटिव्ह आणि दमदार भूमिका आवडतात. मी पंकज त्रिपाठींना एक पत्रही लिहिलं होतं. त्याचं उत्तर मिळालं नाही. पण, माझ्या भावना मी त्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत". 

"मी पत्रात लिहिलं होतं की मी तुमची खूप मोठी चाहती आहे आणि तुमच्यासोबत एकदा कॉफी डेटवर जायचं आहे. पण, पंकज त्रिपाठी अलिबागमध्ये राहतात. त्यामुळेच कदाचित त्यांना कॉफीसाठी वेळ नसावा", असंही महुआ यांनी सांगितलं. एका न्यूज अँकरकडे महुआ यांनी हे पत्र दिलं होतं. जेव्हा त्यांना समजलं की न्यूज अँकर पंकज त्रिपाठींची मुलाखत घेणार आहे. तेव्हा लगेचच त्यांनी त्यांच्या भावना पत्रात लिहून ते पत्र पंकज त्रिपाठींकडे देण्याची विनंती केली होती. 

एवढंच नव्हे तर महुआ यांनी पंकज त्रिपाठींपर्यंत पोहोचण्यासाठी अभिनेता रवी किशन यांचीही मदत घेतली होती. रवी किशन यांनी फोनवरुन पंकज त्रिपाठींशी महुआ यांचा संपर्क करून दिला होता. पण, महुआ लाजल्या आणि त्यामुळे त्या पंकज त्रिपाठींशी फोनवर नीट बोलू शकल्या नाहीत. पंकज त्रिपाठींना भेटण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. पण, त्यांची पंकज त्रिपाठींशी भेट झाली नाही. 

टॅग्स :पंकज त्रिपाठीमहुआ मोईत्रासेलिब्रिटी