Join us

दोन दिवसांवर रिलीज असताना 'फुले' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं, समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:16 IST

'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याविषयी सिनेमाच्या मेकर्सने खुलासा केलाय (phule)

प्रतीक गांधी (pratik gandhi) आणि पत्रलेखा (patralekha) यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'फुले' सिनेमाची (phule movie) सध्या चर्चा आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारीत हा सिनेमा आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेल्याचं समजतंय. सिनेमासंबंधी जो वाद निर्माण झालाय, त्यामुळे मेकर्सने 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ११ एप्रिलला रिलीज होणारा 'फुले' सिनेमाबद्दल नेमका काय वाद निर्माण झालाय,जाणून घ्या.

'फुले' सिनेमाला विरोध का होतोय

ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी 'फुले' सिनेमा जातीभेदाला प्रोत्साहन देतोय असा आरोप केलाय. यामुळे सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यानिमित्त रितेश यांनी बॉलिवूड हंगामाशी बोलताना 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, असं सांगितलं आहे. २४ मार्चला 'फुले' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यावेळी ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सिनेमाला विरोध दर्शवला.

आनंद दवे म्हणाले की, "हा सिनेमा जातीवादाला चालना देत आहे. या सिनेमात ब्राम्हण समाजाने फुले दाम्पत्याला जी मदत केली, ते सुद्धा दाखवलं गेलं पाहिजे. सिनेमाची कहाणी एकतर्फी वाटतेय. फुले सिनेमाचा विषय हा सर्वसमावेश असावा", अशी मागणी ब्राम्हण महासंघाकडून करण्यात आली आहे.  'फुले' सिनेमात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या भूमिकेत असून अभिनेत्री पत्रलेखाने सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली आहे. अनंत महादेवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 

टॅग्स :महात्मा फुले वाडासावित्रीबाई फुलेबॉलिवूड