‘द केरळ स्टोरी’ या वादग्रस्त पण गाजलेल्या चित्रपटाला नुकतेच ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दोन मोठे पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट छायाचित्रण या विभागांत गौरवण्यात आले. मात्र या यशानंतरही दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी समाधान व्यक्त न करता नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, "आमचा चित्रपट अधिक पुरस्कारांसाठी पात्र होता." काय म्हणाले सुदिप्तो सेन? जाणून घ्या
सुदिप्तो सेन पुरस्कार मिळाला तरीही नाराज, कारण...
दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, "या चित्रपटात अदा शर्मा हिने साकारलेली मुख्य भूमिका अत्यंत हृदयस्पर्शी होती. तिच्या अभिनयाला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता, पण तसं झालं नाही, याचं मला वाईट वाटतं. हा चित्रपट १२ वर्षांच्या संघर्षानंतर पूर्ण झाला आहे. अतिशय कठीण परिस्थितीत काम करत आम्ही हा प्रकल्प उभा केला. त्यामुळे या चित्रपटातील प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञ राष्ट्रीय पुरस्काराच्या सन्मानास पात्र आहे,” असं ते म्हणाले.
सेन यांनी असंही स्पष्ट केलं की, “पाच कोटी प्रेक्षकांनी चित्रपट थिएटरमध्ये पाहिला आणि वीस कोटी प्रेक्षकांनी हा चित्रपट ओटीटीवर पाहिला. हीच आमच्यासाठी खरी मान्यता आहे. पुरस्कार हे एक औपचारिक प्रमाणपत्र असलं, तरी लोकांचं प्रेम हाच आमचा सर्वात मोठा सन्मान आहे.”
दुसरीकडे, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ‘द केरल स्टोरी’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी हा चित्रपट ‘वाईट गोष्टींचा प्रचार करणारा’ असल्याचा आरोप केला. त्यांचं म्हणणं आहे की, हा चित्रपट केरळच्या समाज आणि संस्कृतीची चुकीची प्रतिमा निर्माण करतो. या टीकेला उत्तर देताना सुदीप्तो सेन म्हणाले, “मी आजही माझ्या चित्रपटामागे ठामपणे उभा आहे. या चित्रपटात जे दाखवले आहे, ते वास्तव आहे. आमचं काम सत्य सांगण्याचं आहे, ते आमचं कर्तव्य आहे.” अशाप्रकारे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर सुदिप्तो सेन यांनी स्पष्ट मत व्यक्त केलंय.