जॉन अब्राहमच्या बहुचर्चित 'द डिप्लोमॅट' सिनेमाचा ट्रेलर आज व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर रिलीज झालाय. जॉन अब्राहम (john abraham) या सिनेमात डिप्लोमॅट अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. काहीच दिवसांपूर्वी आलेल्या 'द डिप्लोमॅट'च्या टीझरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. नुकतंच 'द डिप्लोमॅट'चा ट्रेलर रिलीज झालाय. 'द डिप्लोमॅट'च्या (the diplomat) ट्रेलरमध्ये मुत्सद्दी अधिकारी म्हणून जबाबदारी निभावणाऱ्या अधिकाऱ्याची थरारक कहाणी पाहायला मिळणार आहे.
'द डिप्लोमॅट'चा ट्रेलर
२०१७ ला जे.पी.सिंग या भारतीय डिप्लोमॅट अधिकाऱ्याने केलेल्या चाणाक्ष आणि साहसी कामगिरीवर हा सिनेमा आधारीत आहे. जे.पी.सिंग यांनी हुशारीचा वापर करुन पाकिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय मुलीला मायदेशी कसं परत आणलं, याची रंजक कहाणी 'द डिप्लोमॅट' सिनेमात बघायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारे अनेक प्रसंग बघायला मिळतात. जॉन अब्राहमची दमदार अदाकारीही बघायला मिळते. 'द डिप्लोमॅट'चा ट्रेलर थरारक आहे त्यामुळे सिनेमाही तितकाच रंजक असेल यात शंका नाही.
'द डिप्लोमॅट' कधी रिलीज होणार?
जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला आगामी 'द डिप्लोमॅट सिनेमा ७ मार्च २०२५ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहमसोबत सदिया खतीब, रेवथी, कुमुद मिश्रा, शरीब हाश्मी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. टी सीरिज, जेए एंटरटेनमेंट, फॉरच्युन पिक्चर्स आणि वकाऊ फिल्म प्रॉडक्शन यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. शिवम नायर यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. एक पॉलिटिकल थ्रिलर म्हणून हा सिनेमा ओळखला जातोय.