सोहम शाह हा बॉलिवूड अभिनेता सध्या सिनेमांमधून विविध प्रयोग करताना दिसत आहे. सोहम शाहचा 'तुंबाड' सिनेमा २०१८ ला रिलीज झाला. हा सिनेमा प्रचंड गाजला. २०२४ मध्ये 'तुंबाड' पुन्हा रिलीज झाला आणि पुन्हा सुपरहिट ठरला. 'तुंबाड'नंतर सोहम शाहच्या आगामी Crazxy सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. नुकताच Crazxy सिनेमाचा टीझर भेटीला आलाय. यामध्ये चक्रव्यूहात अडकलेल्या आजच्या काळातल्या अभिमन्यूची कहाणी दिसतेय.
Crazxy सिनेमाचा टीझर
सोहम शाहची प्रमुख भूमिका असलेला Crazxy सिनेमाच्या टीझरमध्ये सुरुवातीला बॅकग्राऊंडला एक आवाज दिसतो. हा आवाज तुम्हाला ८०-९० च्या दशकातील सिनेमांची आठवण करुन देतो. एका वडिलांच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवसातून ते कसे स्वतःची सुटका करुन घेतात, याची मनोरंजन कहाणी सिनेमात बघायला मिळणार आहे. या टीझरची खास गोष्ट ही आहे की, किशोर कुमार यांच्या आवाजातील गाजलेलं 'अभिमन्यु चक्रव्यूह में फंस गया है तू' हे गाणं ऐकायला मिळतं. अमिताभ बच्चन यांच्या इंकलाब सिनेमात हे गाणं पहिल्यांदा ऐकायला मिळालं.
कधी रिलीज होणार Crazxy?
सोहम शाह निर्मित Crazxy सिनेमाच्या टीझरने सर्वांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन गिरीश कोहली करणार आहेत. सिनेमात सोहम शाह यांची प्रमुख भूमिका दिसणार असून त्यांच्यासोबत कोणते अभिनेते झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. २८ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा भारतात रिलीज होतोय. 'तुंबाड'नंतर सोहम शाह निर्मित हा सिनेमा कसा असणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.