Join us

'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:06 IST

'बाजीराव मस्तानी'चं शूट करताना काय काय घडलं? स्वरांगी मराठेने सांगितली आठवण

मराठी मनोरंजनविश्वात आजवर अनेक मराठी मालिका गाजल्या. त्यापैकीच एक 'आभाळमाया'. या मालिकेचा वेगळा चाहतावर्ग आहे. याचं शीर्षक गीत तर आजही रसिकांच्या ओठांवर आहे. मालिकेत चिंगी या चिमुकलीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री, गायिका स्वरांगी मराठेने (Swarangi Marathe) हिंदीतही काम केलं आहे. 'मिशन काश्मीर','बाजीराव मस्तानी' (Bajirao Mastani) या हिंदी सिनेमांमध्ये तिने छोट्या भूमिका केल्या आहेत. नुकतीच तिने संजय लीला भन्साळींच्या  (Sanjay Leela Bhansali) बाजीराव मस्तानी सिनेमाची आठवण सांगितली.

स्वरांगीची निवड कशी झाली?

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत स्वरांगी म्हणाली,"बाजीराव मस्तानीच्या ऑडिशनसाठी मला फोन आला. माझी त्यात झुमकी ही भूमिका होती. तेव्हा मी काही फार सक्रीयपणे अभिनय करत नव्हते. माझं गाण्यातच करिअर सुरु होतं. आधी मला वाटलं की कोणीतरी माझ्यासोबत मस्करी करत आहे. संजय लीला भन्साळींच्या सिनेमासाठी मला फोन का येईल असंच मला वाटलं. माझा विश्वासच बसत नव्हता. मी जरा चौकशी केली. माझे घरातले सगळे माझ्या मागे लागले की ऑडिशन दे, याकडे जरा गांभीर्याने बघ. मग घरीच व्हिडिओ रेकॉर्ड करुन मी पाठवला. मला आधी वाटलं की महाराष्ट्रीयन भूमिकेसाठीच मला बोलवलं असेल. पण नंतर कळलं की नेहमीप्रमाणे मला डोळ्यांचा रंग, स्कीन कलर पाहता आतापर्यंत मला झुमकीसाख्याच भूमिका ऑफर झाल्या."

...अन् संजय लीला भन्साळी चिडले 

नंतर मला सेटवर ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं. मी तिथे गेले. मला काही फार आशा नव्हती की माझी निवड होईल. कारण माझं काही फार छान हिंदीही नव्हतं. पण नंतर दोन महिन्यांनी मला तुझी अशा अशा भूमिकेसाठी निवड झाली आहे असा फोन आला. संजय लीला भन्साळींनी मला भेटायला बोलवलं. त्यांच्याशी बोलताना खूप छान वाटलं. कारण त्यांना स्वत:ला गाण्यातलं खूप कळतं. त्यांनी मला विचारलं की छोटी भूमिका आहे तर तुला चालेल ना? मी हो म्हणाले. मला खूप शिकायला मिळालं. आधी मी सेटवर खूप रडायचे. कारण सगळे सतत एकदम फोकसने काम करायचे. मला जमेल की नाही याचंच मला टेन्शन असायचं. एकदा रात्री शूट करताना माझे दोन तीन टेक्स एकदम छान झाले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नंतर माझे एकामागोमाग रिटेक्स सुरु झाले. मग भन्साळी सर चिडले. सकाळ झाली आणि पॅकअप झालं. नंतर परत रात्री शूट केलं. भन्साळी सरांचं खूप बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष असायचं. पिनपासून ते ओढणी कशी लावलीये सगळं ते बघायचे. म्हणजे खरंच किती परफेक्शन असायला पाहिजे हे खूप शिकण्यासारखं होतं.

दीपिका पादुकोणबद्दल म्हणाली...

रणवीर सिंहबरोबर माझा एकच सीन होता. दीपिका पादुकोणसोबत माझे सीन्स होते. ती खूप प्रोफेशनल आहे. मला ती खूप डाऊन टू अर्थ वाटली. जेवढं ती माझ्याशी बोलायची ते खूप गोड बोलायची. ती दिसायला किती सुंदर आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. ती खूप रिहर्सल करायची. त्यामागे तिची केवढी मेहनत आहे. त्यांनाही किती मेंटल प्रेशर येत असेल. सतत त्या भूमिकेत राहायचं, शांत डोक्याने काम करायचं हे खूप कठीण आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतासंजय लीला भन्साळीदीपिका पादुकोणबॉलिवूड