बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत मैदानात उतरले. केवळ मैदानात उतरलेच नाहीतर तर राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोपही केलेत. सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला. या आरोपाने भडकलेल्या सुशांतच्या कुटुंबाने आता संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे.सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज कुमार सिंग बबलु यांनी संजय राऊतांनी केलेले सगळे आरोप धुडकावून लावलेत. शिवाय या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबावर केलेला लज्जास्पद आरोप निंदनीय आहे. याविरोधात आम्ही मानहानी दावा करू, असे नीरज म्हणाले.
सुशांतचे मामा आर सी सिंग यांनीही सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केल्याचा आरोप खोडून काढला आहे. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केलेली नाहीत. संजय राऊत चुकीचे बोलत आहेत, असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले होते. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुस-या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला होता.