अभिनेता सनी देओलचा जाट सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमातील सनी देओलचा ढाई किलो का हाथदेखील प्रेक्षकांना खूप भावला. पण तुम्हाला माहित्येय का, चित्रपटाचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांची सनी देओलला मुख्य भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती. त्यानं साउथच्या एका सुपरस्टारला कास्ट करायचे होते. पण ते शक्य झाले नाही आणि अखेर या सिनेमात सनी देओलचीच वर्णी लागली. हा चित्रपट प्रेक्षकांना इतका भावला की, जाटच्या तिसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली. जर सनी देओलला जाट सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती, तर मग तो अभिनेता कोण आहे, हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता असेल ना.
जाट चित्रपटाचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी एक नवीन खुलासा केला आहे. एक्सवरील गुलटे अकाउंटवरून एक ट्विट करण्यात आले आहे, ज्यामध्ये गोपीचंद यांनी खुलासा केला आहे की त्यांनी क्रॅकच्या यशानंतर नंदमुरी बालकृष्ण (एनबीके) सोबत जाटची योजना आखली होती आणि अभिनेत्याने या प्रोजेक्टला हिरवा कंदीलही दाखवला होता. मात्र, अखंडाच्या जबरदस्त यशानंतर, एनबीकेला वाटले की प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्यांना फॅक्शन आधारित कथेवर काम करायचे होते. यासह, वीरा सिम्हा रेड्डी यांचा जन्म झाला आणि हा चित्रपट हिट झाला.
२०२३ मध्ये वीरा सिम्हा रेड्डी प्रदर्शित झाला. एनबीकेच्या या चित्रपटाने ११० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर १३४ कोटी रुपये कमावले. यामध्ये एनबीकेने दुहेरी भूमिका साकारली होती आणि त्याच्यासोबत श्रुती हासन, वरलक्ष्मी शरतकुमार आणि हनी रोज सारखे कलाकारही दिसले होते. या पोस्टवर अनेक कमेंट आल्या आहेत आणि एका व्यक्तीने लिहिले आहे की जाटची कथा वीरा सिम्हा रेड्डीपेक्षा लाख पटीने चांगली होती आणि जाट हा चित्रपटही यापेक्षा लाख पटीने चांगला होता. जाटचा बॉक्स ऑफिस प्रवास सुरूच आहे. ८० कोटींच्या बजेटमध्ये जाटने ११५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.