बीटाऊनमध्ये सध्या परेश रावल (Paresh Rawal) यांनी 'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3) सिनेमा सोडल्याची चर्चा आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. आश्चर्य म्हणजे त्यांनी सिनेमा सोडण्याचं कारण अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीलाही माहित नाहीये. परेश रावल सिनेमातून बाहेर पडल्यानंतर अक्षय कुमारने त्याच्या प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यांच्यावर २५ कोटींचा नुकसानभरपाईचा दावाही ठोकला. तर आता नुकतंच अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) परेश रावल यांच्या एक्झिटवर प्रतिक्रिया दिली.
'इंडिया टुडे'शी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, "हे खूपच धक्कादायक आहे. मी आधी परेशजींना मेसेज करायचा विचार केला. पण नंतर वाटलं की भेटूनच बोलूया. माझं याविषयी कोणाशीच बोलणंही झालेलं नाही. अक्षयला सुद्धा याची कल्पना नव्हती. सिनेमाचं शूट सुरु होणार असताना परेशजींनी घेतलेला हा निर्णय पेचात टाकणाराच आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवणंच कठीण आहे."
तो पुढे म्हणाला, "आम्ही पुढील वर्षी सिनेमाचं शूट सुरु करणार होतो. प्रमोशनसाठी काही सीन्स शूटही केले होते. प्रोमो बनवला होता. ही खूपच मोठी गोष्ट आहे. मला काहीच सुधरत नाहीये. तुम्हाला माहितीये का मला हे बातम्यांमधूनच कळलं की परेशजींनी असा निर्णय घेतला आहे. आणि ही बातमी मला अथिया आणि अहाननेच थोड्यावेळापूर्वी पाठवली. त्यांनी मला विचारलं की बाबा, 'हे काय चालू आहे?' आणि मी इथे मुलाखतीत होतो. मी एकदम गोंधळातच पडलो."
'हेरा फेरी' ही सुपरहिट फ्रँचायझी आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित 'हेरा फेरी' २००० साली आला होता. तर २००६ साली 'फिर हेरा फेरी' आला. तर आता १९ वर्षांनी हेरा फेरीचा तिसऱ्याचा भागाची घोषणा करण्यात आली. बाबूराव, श्याम आणि राजू या तिघांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप आतुर होते. मात्र आता परेश रावल यांनी सिनेमा सोडल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे.