Join us

"देवाला विनंती करेन की..." स्टंटमॅनच्या मृत्यूनंतर हळहळले विकी कौशलचे वडील, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:29 IST

अभिनेता विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले.  

Sham Kaushal On Stuntman's Death: प्रसिद्ध स्टंट कलाकार एस एम राजू यांचा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भीषण कार अपघातात  मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये पा रंजीत दिग्दर्शित तमिळ स्टार आर्यच्या आगामी 'वेट्टुवन' या चित्रपटातील एका धोकादायक कार टपलिंग सीनचं शुटिंग सुरू होतं. यावेळी सीन शूट करत असल्याने हा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजू यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. अभिनेता विकी कौशल आणि सनी कौशल यांचे वडील शाम कौशल (Sham Kaushal ) यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले.  

गेल्या ५० वर्षांपासून धोकादायक स्टंट करणारे शाम कौशल हे एस एम राजू यांच्या निधनानंतर भावूक झाले. एनडीटीव्हीशी बोलताना ते म्हणाले, "काल घडलेल्या दु:खद घटनेबद्दल मला कोणी विचारलं, तर  अगदी मोठमोठ्याने रडावं असं वाटतं. हे आमच्या संपूर्ण फिल्म कम्युनिटी आणि स्टंट कम्युनिटीचे खूप मोठे नुकसान आहे. मी देवाला विनंती करेन की, भविष्यात अशी घटना कधी घडू नये", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

टीव्ही ९ हिंदी डिजिटलशी खास संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, "मी कधीच राजूला भेटलो नव्हतो, पण जेव्हा त्याचा विचार करतोय, तेव्हा माझे डोळे भरून येत आहेत. हे इतकं धक्कादायक आहे की, मी सध्या काहीही विचार करू शकत नाही. शेवटी, स्टंटमन देखील एक माणूसच असतो. मी अपघाताच्या नेमकं काय झालं, कसं झालं या तांत्रिक बाबींवर बोलू शकणार नाही. मी फक्त त्याच्या कुटुंबाचा विचार करतोय आणि तोच विचार करताच मन हेलावून जातंय".

कार स्टंट खरंच खूप धोकादायक असतात का? या प्रश्नावर उत्तर देताना शाम कौशल म्हणाले, "कोणीही जाणूनबुजून धोका पत्करत नाही. पण काहीही कुठेही घडू शकतं. आपण हे थोडंच विचार करून विमानाने प्रवास करतो की, आता हे विमान पडेल? किंवा आपल्या गाडीचा अपघात होईल म्हणून थोडंच आपण रस्त्यावर गाडी चालवणं थांबवतो? झालं ते खूप दुर्दैवी होतं".

शाम कौशल पुढे म्हणाले, "गाड्यांचे स्टंट म्हणजे माणूस आणि मशीन यांचा एकत्रित ताळमेळ असतो. कधी, कुठून, कोणती चूक होईल, याचा नेम नसतो. तरीसुद्धा आजच्या काळात सुरक्षेचं प्रमाण खूप उंचावलेलं आहे. सेटवर खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा असते. भारतात अनेक ठिकाणी शूटिंग होतं, पण अशा प्रकारचे मोठे अपघात फार क्वचितच घडतात. अपघात अतिशय कमी प्रमाणात होतात. आपल्या चित्रपटसृष्टीत स्टंट करताना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा दिली जाते".

शाम कौशल हे अनुभवी स्टंट डायरेक्ट आहेत. शाम कौशल यांनी इंडस्ट्रीतील जवळजवळ सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. शाम यांनी स्वतः ८० च्या दशकात स्टंटमॅन म्हणून करिअरला सुरुवात केली होती.  शाम यांनी आपल्या कारकिर्दीत गँग्ज ऑफ वासेपूर, बाजीराव मस्तानी, दंगल, पद्मावत, सिम्बा आणि नुकताच प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'गदर २' यासह अनेक सुपरहिट चित्रपटांचे ॲक्शन दिग्दर्शित केले आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीविकी कौशल