अभिनेता सोनू सूद याचे नाव आता अभिनयापेक्षा सामजिक क्षेत्रात जास्त घेतले जाते. चाहत्यांमध्ये अभिनेता त्याच्या दिलदारपणासाठी ओळखला जातो. कोविडच्या काळात त्याने समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचत मदतकार्य केले, त्याचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. सोनूला आतापर्यंत अनेक प्रसिद्ध मंचांवर सन्मानित करण्यात आले. आता पुन्हा एका सोनू सुदाचा गौरव करण्यात आलाय.
सोनू सूदला आता ७२व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत ग्रँड फिनालेमध्ये मानाच्या 'ह्यूमॅनिटेरयििन अवॉर्ड'ने गौरवण्यात आले आहे. हा सोहळा ३१ मे रोजी हैदराबादमधील हिटेक्स एरिना येथे आयोजित करण्यात आला आहे. 'सूद चॅरिटी फाउंडेशन'च्या माध्यमातून सोनूच्या कार्याला सलाम केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोना साथीनंतरही सोनू सूदने बेरोजगार आणि असहाय लोकांची मदत केली आहे. लोकांना मदत करण्यासाठी सोनू अनेकदा वेगेवगळ्या मार्गाचा अवलंब धरतो. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू हा खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांसाठी हिरो ठरला आहे. केवळ पडद्यावर भूमिका न निभावता खऱ्या आयुष्यात आपली सामाजिक बांधिलकी ओळखून केलेले सोनूचे हे कार्य एक आदर्श निर्माण करणारं आहे.सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता 'फतेह' या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसही झळकली होती.