बॉलिवूडचा 'रिअल लाईफ हिरो' म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र यावेळी कारण थोडंसं वेगळं आहे. अलीकडेच सोशल मीडियावर सोनू सूदचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. ज्यामध्ये सोनू सूद शर्टलेस आणि हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसला. या व्हिडीओवर सोशल मीडियावरून लोकांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली. ज्यामुळे हिमाचल प्रदेश पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली. या व्हिडीओवर आता अभिनेता सोनू सूदने स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.
सोनू सूदने संबंधित व्हिडीओ हा शूटिंगदरम्यानचा असल्याचं स्पष्ट केलं. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हेल्मेट घालून बाईक चालवतानाचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्याने लिहिलं की, "सुरक्षितता प्रथम येते. मी नेहमीच नियमांचे पालन करतो. व्हायरल क्लिप ही स्क्रिप्टचा भाग आहे. म्हणून कृपया त्याकडे दुर्लक्ष करा. हुशारीने आणि सुरक्षितपणे गाडी चालवा, नेहमी हेल्मेट घाला", असं त्यानं म्हटलं.
सोनू सूदचा व्हिडीओ Ride With Victor नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला होता. ज्यात सोनू सूद शर्ट न घातलेला, सनग्लासेस लावलेला, बर्फाच्छादित कड्यावर एका ग्रुपसोबत वेगात बाईक चालवताना दिसला. विशेष बाब म्हणजे, इतर सर्व दुचाकीस्वार हेल्मेटमध्ये दिसले, मात्र सोनूने हेल्मेट परिधान केलेलं नव्हतं. यावर एका या युजरने हा व्हिडीओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला होता की, "हेल्मेटशिवाय आणि शर्टशिवाय बाईक चालवल्याबद्दल सोनू सूदवर कारवाई का होत नाही?". तर यावर हिमाचल प्रदेश पोलिसांनी अधिकृत उत्तर देत म्हटलं की, "हा व्हिडिओ लाहौल-स्पीती भागातील असून, चौकशी सुरू आहे. जर अभिनेता नियम तोडताना आढळला, तर कारवाई केली जाईल".