प्राईम व्हिडिओच्या बहुचर्चित ‘सॉन्ग ऑफ पॅराडाईज’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये स्वप्न, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणादायी झलक पाहायला मिळतेय. ही फिल्म एक्सेल एंटरटेनमेंटने सादर केली असून दानिश रेंजू यांनी दिग्दर्शित केली आहे. याशिवाय शफत काझी व दानिश रेंजू यांनी निर्मिती केली आहे. ‘सॉन्ग ऑफ पॅराडाईज’मध्ये सबा आझाद, सोनी राझदान, झैन खान दुर्रानी, शीबा चड्ढा, तारुक रैना, शिशिर शर्मा आणि लिलिट दुबे या कलाकारांचा समावेश आहे.
प्राईम व्हिडिओने ‘सॉन्ग ऑफ पॅराडाईज’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सबा आझाद आणि सोनी राझदान अभिनित ही कहाणी अतिशय हृदयस्पर्शी आहे. ही फिल्म पद्मश्री पुरस्कार विजेती काश्मिरी गायिका राज बेगम यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या संगीतप्रवासातून प्रेरित आहे. दानिश रेंजू यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून निरंजन अय्यंगार आणि सुनयना कचरू यांनीही लेखनात योगदान दिले आहे. ही फिल्म काश्मीरच्या पहिल्या महिला पार्श्वगायिकेला, ‘राज बेगम’ यांना वाहिलेली एक आदरांजली आहे.
चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट, अॅपल ट्री पिक्चर्स आणि रेंजू फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे. ट्रेलरमध्ये ‘नूर बेगम’च्या जीवनाचा आणि त्यांच्या गायनाचा सुरेल प्रवास पाहायला मिळतो, ज्यात सबा आझाद आणि सोनी राझदान यांनी दोन वेगवेगळ्या काळातली नूरची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट धैर्य, सामाजिक बंधनं मोडण्याची जिद्द आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध यांची कहाणी आहे. हा सिनेमा २९ ऑगस्टला प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
नूर ही एक अत्यंत प्रतिभावान तरुण गायिका आहे, जी त्या काळात महिलांवर असलेल्या सामाजिक निर्बंधांचा सामना करत आपल्या स्वप्नांसाठी लढा देते. ‘सॉन्ग ऑफ पॅराडाईज’ ही तिच्या प्रेरणादायी संगीत प्रवासाला दिलेली एक आदरांजली आहे. अभय सोपोरी यांच्या संगीतात आणि मस्रत उन्न निसा यांच्या आवाजामुळे या चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळते. चित्रपटात काश्मीरच्या समृद्ध संगीत परंपरेचं आणि भावनिक पार्श्वभूमीचं अत्यंत सुंदर दर्शन घडतं. विशेष म्हणजे हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादचा अभिनय यामुळे पाहायला मिळणार आहे. याशिवाय सोनी राझदान या आलिया भटची आई आहेत.