२०१२ साली आलेल्या 'सन ऑफ सरदार' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं होतं. या सिनेमातील कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता १३ वर्षांनी या सिनेमाचा सिक्वल अर्थात 'सन ऑफ सरदार २' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2) सिनेमात मराठमोळी मृणाल ठाकूर झळकली आहे. अजय देवगणसोबत पहिल्यांदाच मृणाल ठाकुरनं स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमात मृणालनं पंजाबी मुलीचं पात्र साकारलंय. तर या पंजाबी पात्रासाठी मराठमोळ्या मृणालच्या निवडीमागचं कारण अजय देवगणने एका मुलाखतीत स्पष्ट केलं.
नुकतंच अजय देवगण आणि मृणाल ठाकूर हे अर्चना पूरण सिंगच्या यूट्यूब चॅनलच्या व्लॉगमध्ये दिसले. या भेटीत अर्चनाचे पती आणि अभिनेता परमीत सेठी आणि दोन्ही मुले देखील उपस्थित होती. संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे अजय आणि मृणाल यांच्याशी 'सन ऑफ सरदार २' बद्दल चर्चा केली. या संभाषणात अजय देवगणला अर्चनानं विचारलं की महाराष्ट्रीयन मुलगी मृणाल ठाकूरला पंजाबी पात्रासाठी कसं कास्ट केलं? या प्रश्नावर उत्तर देताना अजय देवगण म्हणाला, "मला तिच्याकडून जो परफॉर्मन्स अपेक्षित होता, तिनं त्यापेक्षा चांगला अभिनय केला आहे. तिनं पंजाबीदेखील खूप चांगली बोलली आहे. खरं तर माझ्यापेक्षा चांगली पंजाबी ती बोलली आहे".
पुढे मृणाल ठाकूरनं अजय देवगणसोबत झालेल्या एका खास संभाषणाचा उल्लेख करत सांगितलं की, "ही तीन वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एकदा अजय यांनी मला फोन केला होता. ते म्हणाले की, एक चांगला चित्रपट आहे आणि त्यासाठी मला हवी आहेस. मात्र काही कारणांमुळे तो चित्रपट पुढे झाला नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की, काहीही झालं तरी मला तुमच्यासोबत काम करायचं आहे" मृणालनं पुढे सांगितलं, "जेव्हा मला 'सन ऑफ सरदार २'साठी विचारण्यात आलं, तेव्हा मी लगेच तयार झाले". यावेळी मृणालनं सांगितलं की तिनं सिनेमातील पात्रासाठी डान्स, भाषा सर्व शिकली आणि त्यासाठी सरावही केला.
'सन ऑफ सरदार २'चं येत्या २८ जुलै रोजी अॅडव्हान्स बुकिंग सुरु होणार आहे. तर १ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज केला जाणार आहे. त्याच दिवशी सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीचा 'धडक २'ही रिलीज होणार आहे. त्यामुळे 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २'चा क्लॅश होणार आहे. 'सन ऑफ सरदार २' सिनेमाचा ट्रेलर लोकांना खूप आवडलाय. अजय आणि मृणाल ठाकूरची केमिस्ट्रीही खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक झालेत.