Son Of Sardaar 2 Review: अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २'ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने रिलीजच्या आधीच कोट्यवधींची कमाई केली होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आज १ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये 'सन ऑफ सरदार २' प्रदर्शित झाला आहे. अॅडव्हान्स बुकिंगदरम्यान या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी होणार, हे निश्चित होतं. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट पाहिल्यानंतर तो चाहत्यांना कसा वाटला, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. चला पाहूया 'सन ऑफ सरदार २' प्रेक्षकांना आवडलाय की नाही.
'सन ऑफ सरदार २'चा ट्विटर रिव्ह्यूवरून समोर आला आहे. 'सन ऑफ सरदार २' प्रेक्षकांना नेमका कसा वाटला याबद्दल ट्विटरवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. प्रेक्षकांनी या चित्रपटाला रोमान्स, भावनिक आणि विनोदाचं मिश्रण असल्याचं म्हटलं आहे. विजय कुमार अरोरा दिग्दर्शित हा चित्रपट केवळ हास्याची मेजवानी नाही, तर तो संपूर्ण कुटुंबासाठी एक परिपूर्ण मनोरंजन ठरतोय.
चित्रपट पाहिल्यानंतर एका युजरनं ट्विट करत लिहलं, "हा एक अद्भुत चित्रपट आहे, त्यात भरपूर विनोद आहेत. हा एक संपूर्ण कुटुंब मनोरंजन करणारा चित्रपट आहे".
आणखी एकानं लिहलं, 'सन ऑफ सरदार २' हा एक रोमँटिक, भावनिक विनोदी चित्रपट आहे, एक उत्तम कौटुंबिक चित्रपट आहे जो प्रत्येकाने पाहावा. अजय देवगण आणि रवी किशन यांच्या जोडीने अद्भुत कामगिरी केली आहे".
अभिनेता सुनील शेट्टी याने देखील 'सन ऑफ सरदार २' पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं सोशल मीडियावर शेअर करत अजयच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. त्याने लिहिलं," सर्व ठिकाणांपैकी… लंडन ही अशी जागा आहे जिथे वेडेपणा खरंच उफाळून येतो! अजय आणि अहानसोबत 'सन ऑफ सरदार २' पाहिला. अरे बापरे, काय जबरदस्त हसवणारा चित्रपट आहे. खूप हसलो. असा चित्रपट शोधणं कठीण आहे, जो पाहताना पिढ्या एकत्र हसतात. अजय फक्त तूच असा अप्रतिम वेडेपणा स्वॅगसोबत करू शकतोस".
'सन ऑफ सरदार २' चित्रपटात अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर, रवी किशन, संजय मिश्रा आणि मुकुल देव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा २०१२ साली आलेल्या 'सन ऑफ सरदार'चा हा सीक्वेल आहे. 'सन ऑफ सरदार'चा पहिला भाग ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला होता. त्यावेळी १४१.८९ कोटी रुपयांची कमाई करून तो सुपरहिट ठरला होता. यामुळेच दुसऱ्या भागाकडून निर्मात्यांना मोठी अपेक्षा आहे.