बॉलिवूड अभिनेता सोहेल खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. सोहेलने पत्नी सीमा सजदेहसोबत २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. २४ वर्षांच्या सुखी संसारानंतर सोहेल आणि सीमा घटस्फोट घेत वेगळे झाले. घटस्फोटानंतर इतक्या दिवसांनी आता पहिल्यांदाच सोहेलने एक्स पत्नी सीमाबाबत भाष्य केलं आहे.
सोहेलने नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सीमा सजदेहसोबतच्या घटस्फोटावर भाष्य केलं. तो म्हणाला, "मी सीमासोबत २४ वर्ष संसार केला. ती एक सुंदर मुलगी आहे. पण, काही गोष्टी वर्क आऊट झाल्या नाहीत. पण, यामुळे आमच्या नात्यात काहीच बदल झालेला नाही. ती एक चांगली व्यक्ती आणि उत्तम आई आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक नव्हत्या, पण याचा अर्थ आम्ही एकमेकांचा द्वेष करतो असा नाही. वर्षातून एकदा पालक म्हणून आम्ही आमच्या मुलांसोबत संपूर्ण कुटुंब कुठेतरी फिरायला जायचं हे आधीच ठरलेलं असतं. आणि आम्ही खूप मजा करतो".
पुढे सोहेल म्हणाला, "जेव्हा पती-पत्नीमध्ये भांडणं होतात तेव्हा त्याचा परिणाम मुलांवर होतो. पती-पत्नीच्या अहंकाराचा त्रास मुलांना सहन करावा लागतो. त्यामुळे मुलं डिस्टर्ब होतात. आपण आपल्याच पुढच्या पिढीला त्रास देत असतो. त्यामुळे तुमच्या मुलांची वाढही तशीच होते. हे आम्हाला आमच्या मुलांसोबत होऊ द्यायचं नव्हतं. निर्वाण आणि योहान यांना आम्ही सिंगल पालक म्हणून वाढवत आहोत. आणि यात काहीच चुकीचं नाही याची जाणी त्यांना करून देत आहोत. प्रेम हे कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे".