'गँगस्टर', 'क्रिश ३' , 'झूम बराबर झूम' सारख्या काही बॉलिवूड सिनेमांमध्ये पार्श्वगायन करणारा जुबीन गर्गचं अचानक निधन झालं आहे. वयाच्या ५२ व्या वर्षीच त्याने जगाचा निरोप घेतला. जुबीनच्या निधनाचं कारणही धक्कादायक आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना त्याचा मृत्यू झाला. जुबीनचं आसामी संगीत जगतात मोठं योगदान आहे. आसामचे आरोग्य मंत्री अशोक सिंघल यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
मंत्री अशोक सिंघल यांनी ट्वीट करत लिहिले, "जुबीन गर्गच्या निधनाने अतीव दु:ख होत आहे. आसामने फक्त चांगला आवाजच नाही तर हृदयाचा ठोकाच गमावला आहे. जुबीन दा फक्त गायक नव्हता तर आसाम आणि संपूर्ण देशासाठी गर्व होता. त्याच्या गाण्यांनी आपली संस्कृती, भावना जगाच्या कानाकोपऱ्यात नेली. त्याच्या संगीतात अनेक पिढींना आनंद, सांत्वना आणि ओळख मिळाली. आसामने त्यांचा लाडका मुलगा आणि भारताने सर्वोत्तम सांस्कृतिक आयकॉन गमावला आहे. त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईक, मित्रपरिवाच्या दु:खात मी सहभआगी आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्याचा वारसा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहो."
प्रसिद्ध गायक पपॉननेही पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. त्याने लिहिले, "खूपच धक्कादायक.. एका पिढीचा आवाज हरपला. खूप लवकर गेलास मित्रा. बोलायला शब्दच नाहीत. आज मी मित्र, भाऊ गमावला. खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तुझ्या आत्म्याला शांती मिळो."
जुबीन गर्गचं 'गँगस्टर' सिनेमातील 'या अली' हे गाणं गाजलं. तसंच 'क्रिश ३'मध्ये हृतिक रोशन, कंगना राणौतवर चित्रीत झालेलं 'दिल तु ही बता' हेही गाणं जुबीननेच गायलं होतं. तसंच सुनिधी चौहानसोबत त्याने 'झुम बराबर झुम' हे लोकप्रिय गाणंही गायलं.