अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) काही दिवसांपूर्वीच बाबा झाला. पत्नी कियारा अडवाणीने गोंडस मुलीला जन्म दिला. लेकीच्या आगमनाने दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सिद्धार्थच्या आईला दोन्ही मुलंच असल्याने आपल्याला नात हवी अशी त्यांची खूप इच्छा होती. त्यांची इच्छा आता पूर्ण झाली आहे. मल्होत्रा कुटुंबात आई आणि बाळाचं जंगी स्वागतही करण्यात आलं. लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ आपल्या आईसोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला.
बाबा झाल्यानंतर बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा आज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आला होता. निळा कुर्ता, ब्लॅक डेनिम्स अशा साध्या लूकमध्ये तो दिसला. सिद्धार्थने बाप्पाच्या चरणी डोकं टेकवून लेकीसाठीही आशीर्वाद घेतले. सिद्धार्थसोबत त्याची आईही होती. सिद्धिविनायक मंदिरातील त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सिद्धार्थ आणि कियारा 'शेरशाह'सिनेमाच्या सेटवर भेटले. तिथेच दोघांमध्ये ऑफस्क्रीनही प्रेम खुललं. काही वर्ष डेट केल्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. दोन वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. १६ जुलै रोजी कियाराने मुलीला जन्म दिला. आता त्यांच्या लेकीचं नाव काय असणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
कियारा अडवाणीचा 'वॉर २' लवकरच रिलीज होणार आहे. तर सिद्धार्थ मल्होत्राचा जान्हवी कपूरसोबत 'परम सुंदरी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. लेकीच्या जन्मानंतर आता कियारा पुन्हा कामावर कधी परतणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.