मराठमोळा लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मराठीसोबतच हिंदी, साऊथ इंडस्ट्रीतही सक्रीय असतो. 'पुष्पा' आणि 'पुष्पा २' या गाजलेल्या सिनेमांसाठी त्याने आवाज दिला. अल्लू अर्जुनसाठी त्याने केलेलं डबिंग सगळ्यांनी डोक्यावर उचलून धरलं. श्रेयस तळपदेने दिग्दर्शन क्षेत्रातही यशस्वी पदार्पण केलेले आहे. श्रेयस तळपदेनं दिग्दर्शित केलेल्या हिं 'पोस्टर बॉयझ' (Poshter Boyz) या हिंदी चित्रपटला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने श्रेयसने सोशल मीडियावर एक खास आणि भावुक पोस्ट शेअर केली आहे.
श्रेयसने या पोस्टमध्ये लिहलं, ""पोस्टर बॉईज" या हिंदी चित्रपटाला ८ वर्षं पूर्ण! हा माझा हिंदी फिल्म इंडस्ट्रीत दिग्दर्शक म्हणून पहिला डेब्यू चित्रपट होता! खरंच… वेळ किती पटकन निघून जातो". याच पोस्टमध्ये पुढे श्रेयसने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. सर्वात आधी त्याने चित्रपटातील मुख्य अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओलचे आभार मानले. त्यानं लिहलं, "मला दिग्दर्शक बनवल्याबद्दल आणि एक मजबूत आधारस्तंभ असल्याबद्दल सनी देओल पाजींचे खूप खूप आभार". बॉबी देओलला उद्देशून तो म्हणाला, "एक चांगला मित्र आणि सर्वोत्तम सह-अभिनेता असल्याबद्दल बॉबी देओल तुझेही आभार".
श्रेयसने याच चित्रपटातून अभिनेत्री तृप्ती डिमरीला हिंदी चित्रपटसृष्टीत संधी दिली होती. तिच्याबद्दल लिहिताना तो म्हणाला, "तुला चित्रपटांच्या दुनियेची ओळख करून देताना आम्हाला आनंद झाला. तू घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे". यासोबतच त्याने सोनाली कुलकर्णी, समीक्षा भटनागर आणि त्याची पत्नी व चित्रपटाची निर्माती दीप्ती तळपदे यांचेही विशेष आभार मानले. तर शेवटी त्याने चित्रपटाच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा असलेल्या चाहत्यांचे आभार मानले. "या चित्रपटाला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचेही आभार, कारण तुमच्यामुळेच हा चित्रपट ८ वर्षे पूर्ण करूनही माझ्या मनात ताजा आहे", असे त्याने म्हटले.