'अर्जुन रेड्डी' सिनेमाच्या माध्यमातून सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शालिनी पांडे. शालिनीने अलीकडे 'जयेशभाई जोरदार' या सिनेमात आणि 'डब्बा कार्टल' या वेबसीरिजमध्येही काम केलंय. प्रभावी अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शालिनी पांडे आता 'राहू केतू' या बहुप्रतीक्षित डार्क कॉमेडी चित्रपटाच्या दुसऱ्या शूटिंग शेड्यूलसाठी निसर्गरम्य मनालीकडे रवाना झाली आहे. पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा यांच्यासोबत शालिनी या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
राहू केतूची उत्सुकता शिगेला
शालिनीने 'अर्जुन रेड्डी'मधून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली आणि 'जयेशभाई जोरदार'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'महाराज'मध्ये जुनेद खानसोबत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नुकतंच तिने 'डब्बा कार्टेल'मध्ये खास भूमिका साकारली. प्रत्येक भूमिकेचा सखोल अभ्यास आणि भावनिकता दाखवण्यात शालिनी यशस्वी ठरते. आता शालिनी आगामी 'राहू केतू' सिनेमात झळकणार आहे. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटात निसर्गाचं सौंदर्य बघायला मिळेलच शिवाय कथानकातील गोंधळ अनुभवत प्रेक्षक लोटपोट होतील, यात शंका नाही.
आता 'राहू केतू' सिनेमाच्या मनाली शेड्यूलला सुरुवात झाल्याने, या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. निसर्गाची अद्भुत रचना आणि वरुण, पुलकित, शालिनी या त्रिकूटाच्या अभिनयात गुंफलेली ही कथा पुढील वर्षात अर्थात २०२६ मध्ये एक रोमांचक सिनेमॅटिक अनुभव देईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. झी स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली असून विपुल विग यांनी सिनेमाचं दिग्दर्शन करणात आहेत.