७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards) काल घोषणा झाली. '१२ वी फेल' सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. तर अभिनेता शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी दोघांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घोषित झाला. राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. विशेष म्हणजे शाहरुख खान आणि राणी मुखर्जी दोघांचाही हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. शाहरुख खानला त्याच्या ३३ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. मात्र सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. शाहरुखला (Shahrukh Khan) 'जवान' साठी नाही तर अन्य सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता असं अनेकांचं म्हणणं आहे.
शाहरुख खान ज्याला बॉलिवूडचा 'किंग' असेही संबोधले जाते. ३३ वर्षांपूर्वी त्याने 'दीवाना' सिनेमातून पदार्पण केलं होतं. शाहरुखने तेव्हापासून आजपर्यंत अनेक दमदार सिनेमे दिले. शाहरुख खानच्या सिनेमांमध्ये २००४ साली आलेल्या 'स्वदेस' सिनेमाचं नाव येणार नाही असं होऊच शकत नाही. या सिनेमामध्ये शाहरुखच्या अभिनयाची एक वेगळीच उंची सर्वांना पाहिली होती. मात्र सिनेमातील त्याच्या सर्वोत्तम कामासाठी त्याला तेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही. तर आता त्याला २०२३ मध्ये आलेल्या 'जवान'साठी पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आजही चाहते शाहरुखला 'स्वदेस'साठीच राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता असं मत व्यक्त करत आहेत.
एकाने कमेंट करत लिहिले, "ज्या सिस्टीमने 'स्वदेस'कडे दुर्लक्ष केलं आणि 'जवान'ला सम्मानित केलं, त्या सिस्टीमला आत्मपरीक्षणाची गरज आहे", 'एसआरके ला स्वदेस साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता, जवान फक्त एक स्टारडमने भरलेला सिनेमा होता'. तर आणखी एकाने लिहिले, 'माय नेम इज खान', 'चक दे इंडिया', 'देवदास' आणि स्वदेस' या चारही सिनेमासाठी तो राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र होता.'.
असो, अखेर शाहरुखला इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळालाच. २०२३ आलेला 'जवान' हा त्याचा कमबॅक सिनेमा होता. चार वर्षांच्या ब्रेकनंतर आणि सलग काही फ्लॉप सिनेमांनंतर तो पुन्हा स्क्रीनवर आला होता. साऊथ दिग्दर्शक अॅटलीने सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.