Join us

पहिल्यांदाच दिसली 'किंग'ची झलक, शाहरुख खानचे सेटवरील फोटो लीक; 'या' ठिकाणी सुरुए शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:55 IST

शाहरुखचा 'किंग' लूक पाहिलात का?

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसाठी (Shahrukh Khan) २०२३ हे वर्ष खूपच लकी होतं. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' अशा ३ सलग सुपरहिट सिनेमांमधून त्याने ते वर्ष गाजवलं. 'जवान'साठी शाहरुखला यंदा राष्ट्रीय पुरस्कारही घोषित झाला आहे. त्यानंतर २ वर्ष झाले शाहरुखचा सिनेमा आलेला नाही. सध्या तो 'किंग' सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. दरम्यान नुकतंच सिनेमाच्या सेटवरुन त्याचा पहिला फोटो लीक झाला आहे. शाहरुखचा यातील लूक पाहून चाहते आणखी आतुर झाले आहेत.

'किंग' सिनेमाचं शूट काही महिन्यांपासून सुरु आहे. याच सिनेमाच्या शूटवेळी शाहरुखला दुखापत झाली. त्याच्या एका हाताला पट्टी बांधली आहे. आर्यन खानच्या सीरिजच्या ट्रेलर लाँचवेळीही शाहरुख हाताला पट्टी लावून आला होता. तर आता पुन्हा त्याने शूटला सुरुवात केली आहे. पोलंडमधील वारसॉ येथे सिनेमाचं शूट सुरु असताना काहींनी फोटो आणि व्हिडिओ क्लिक केले. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 'किंग'ची पहिली झलक आता समोर आली आहे. शाहरुखचा खूँखार लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या सिनेमात शाहरुखची लाडकी लेक सुहाना देखील असणार आहे. पहिल्यांदाच ती वडिलांसोबत ऑनस्क्रीन काम करणार आहे. सुहानाचा सिनेमात अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. या सिनेमाकडून शाहरुख आणि त्याच्या चाहत्यांनाही खूप अपेक्षा आहे. सिनेमात जयदीप अहलावत, अभय वर्मा, अभिषेक बच्चन यांचीही भूमिका आहे. तसंच दीपिका पादुकोणचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड