Join us

"शाहरुख नमस्कार करतच नाही..." विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर चाहत्यांनी दाखवले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 16:30 IST

विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

'द काश्मीर फाईल्स' फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) बऱ्याचदा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना टार्गेट करतात. त्यांच्यावर टीका करतात. आता विवेक अग्निहोत्री यांनी शाहरुख खानबद्दल (Shahrukh Khan) एक वक्तव्य केलंय ज्यामुळे किंग खानच्या चाहत्यांना राग आलाय. त्यामुळे शाहरुखच्या आधी चाहत्यांनीच  विवेक अग्निहोत्रींना उत्तर दिलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये ते म्हणतात,'भारतातील तीन प्रमुख कलाकार हे मुस्लिम आहेत. त्यातले दोन तर अगदी कट्टर आहेत. शाहरुख खान कधीच नमस्ते म्हणत नाही तो नेहमी सलाम सलाम सलाम म्हणतो.' विवेक यांच्या बोलण्याचा अर्थ शाहरुख कधीच नमस्कार करताना दिसत नाही तर तो नेहमी सलाम करताना दिसतो.

विवेक अग्निहोत्रींच्या या वक्तव्यावरुन किंग खानच्या चाहत्यांनी त्यांना धारेवर धरलंय. त्यांच्या व्हिडिओपुढे चाहत्यांनी शाहरुखचे विविध ठिकाणी नमस्कार करतानाचे फोटो लावले आहेत. शाहरुख फक्त सलामच करत नाही तर तो नमस्कारही करतो असे पुरावेच त्यांनी दाखवले आहेत. 'द व्हॅक्सिन वॉर' सिनेमा पाहायच्या आधी हा व्हिडिओ बघा असं म्हणत एका ट्विटर युझरने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

विवेक अग्निहोत्रींनी काही दिवसांपूर्वीच शाहरुखच्या 'जवान' सिनेमाचं कौतुक केलं होतं. तर दुसरीकडे त्यांनी शाहरुखसंदर्भात असं वक्तव्य केल्याने चाहत्यांनी त्यांना धारेवरच धरलंय. सध्या शाहरुखच्या 'जवान' सिनेमाने धुमाकूळ घातला आहे तर विवेक अग्निहोत्री 'द व्हॅक्सीन वॉर' सिनेमा घेऊन येत आहेत. यामध्ये नाना पाटेकर, गिरीजा ओक, अनुपम खेर, पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीशाहरुख खान