बॉलिवूडचा देखणा आणि प्रतिभावान म्हणजेच अभिनेता शाहिद कपूर. इंडस्ट्रीत दोन दशकांहून अधिक काळ घालवलेल्या शाहिद कपूरने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. 'हैदर', 'उडता पंजाब', 'कबीर सिंग' सारखे दमदार चित्रपट देणाऱ्या शाहिदचे त्याच्या उत्तम अभिनयासाठी खूप कौतुक केले जाते. शाहिदच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. यातच आता त्याच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे.
शाहीद कपूर हा 'ओ' रोमियो' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाले आहे. तसेच चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या नव्या पोस्टरमध्ये शाहिद कपूरने मोठी टोपी घातली असून, त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला दिसत आहे. हा चित्रपट पूर्वी ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून तो १४ फेब्रुवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.
शाहिद आणि विशाल भारद्वाज ही जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आली आहे. शाहिद आणि विशाल भारद्वाज यांची जोडी नेहमीच यशस्वी ठरली आहे. 'कमीने', 'हैदर' आणि 'रंगून' यांसारख्या चित्रपटांनंतर ही जोडी आता पुन्हा एकदा चौथ्यांदा एकत्र काम केलंय. 'ओ' रोमियो'मध्ये शाहिदसोबतच दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय, फरीदा जलाल, रणदीप हुडा आणि दिशा पटानी हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.