ज्येष्ठ अभिनेत्री सीमा पाहवा (Seema Pahwa) यांनी अनेक हिंदी सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्या मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. सुरुवातीला त्यांनी हिंदी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नुकतंच त्यांनी फिल्म इंडस्ट्रीच्या सध्याच्या परिस्थितीवर जोरदार टीका केली. इंडस्ट्री आता पूर्णत: व्यावसायिक झाली असून क्रिएटिव्ह लोकांचा इथे सम्मानच राहिलेला नाही असं त्यांनी भाष्य केलं आहे.
'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीत सीमा पाहवा म्हणाल्या, "मला वाटतं मी लवकरच फिल्म इंडस्ट्रीला कायमचा निरोप देईन. इंडस्ट्रीची स्थिती वाईट झाली आहे आणि आ इंडस्ट्रीने क्रिएटिव्ह लोकांची हत्याच केली आहे. संपूर्ण इंडस्ट्री आता व्यावसायिकांच्या ताब्यात गेली आहे. ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे या इंडस्ट्रीला जिवंत ठेवू इच्छितात. इतक्या वर्षांपासून इंडस्ट्रीत असणारे आमच्या सारखे कलाकार अशा मानसिकतेत टिकूच शकत नाहीत."
त्या पुढे म्हणाल्या, "इंडस्ट्रीत आर्टिस्टिक व्हॅल्यू बाजूला सारली जात आहे. फिल्ममेकर फिल्म बनवण्यासाठी मोठ्या तारे तारकांना जास्त प्राधान्य देत आहेत. त्यांना केवळ पैसे कमवायचे आहेत मला मान्य आहे आणि म्हणूनच त्यांना आता आमची गरज राहिलेली नाही. जुने लोक म्हणत ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात. आमचे विचार जुने आहेत असं ते म्हणतात. त्यांना वाटतं एक अभिनेताच सिनेमाला यश मिळवून देऊ शकतो. केवळ कमर्शियल गोष्टीच सिनेमाला यशस्वी बनवतात. मला त्यांना हेच सांगायचंय की १०० कोटींचा सिनेमा बनवण्याएवढी तुम्ही रिस्क घेता. त्यापेक्षा २०-२० कोटींचे ५ सिनेमे बनवा. कमीत कमी दोन तरी हिट होतील. पण या लोकांना त्याच जुन्या फॉर्म्युलांवर काम करायचं आहे. मी आता थिएटरवर लक्ष्य देत आहे आणि त्यातच आनंदी आहे. आम्हाला आता सिनेमांमध्ये तो आदर मिळणार नाही ज्यासाठी आम्ही पात्र आहोत."