Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांचं अपहरण अन्...! विक्रांत मेस्सीच्या 'सेक्टर ३६'चा ट्रेलर पाहून उडेल थरकाप, दिसणार 'ही' सत्य घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 17:04 IST

दिल्लीत घडलेल्या सत्या घटनेवर आधारीत विक्रांत मेस्सीचा आगामी सिनेमा आहे

सध्या मनोरंजन विश्वात सत्य घटनांवर आधारीत विविध सिनेमे भेटीला येत आहेत. काही महिन्यांपूर्वी आलेला 'भक्षक' सिनेमा अशाच एका सत्य घटनेवर आधारीत होता. सध्या 'स्त्री २' सिनेमा गाजत आहे. हे सांगायचं कारण म्हणजे, 'स्त्री २'च्या निर्मात्यांनी एका नवीन सिनेमाची घोषणा केलीय. 'सेक्टर ३६' असं या सिनेमाचं नाव असून देशात घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा आहे. सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय. 

'सेक्टर ३६'चा ट्रेलर

विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असलेल्या 'सेक्टर ३६'च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला साध्याभोळ्या चेहऱ्याचा विक्रांत पाहायला मिळतो. तो एका लहान मुलाला चॉकलेट देऊन त्याच्यावर चादर टाकून त्याचा खून करताना दिसतो. पुढे अशीच काही निष्पाप लहान मुलं शहरातून गायब होतात. त्यांना निघृणरित्या मारलं जातं. या केसचा गुंता सोडवायला पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दीपक डोब्रियालची एन्ट्री दिसते. पुढे विक्रांत आणि दीपक यांच्यामध्ये चोर - पोलिसांचा एक डाव रंगतो. साधारण २ मिनिटांच्या या ट्रेलरने आपलाही थरकाप उडतो. नेटफ्लिक्सवर १३ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

दिल्लीतील निठारी कांड घटना दिसणार

 'सेक्टर ३६' या सिनेमात दिल्लीमध्ये घडलेली निठारी कांड घटना उलगडणार आहे. २००६ मध्ये दिल्लीतील नॉएडा सेक्टर ३६ मध्ये ही घटना घडली होती. या घटनेत सुरिंदर कोली या माथेफिरु माणसाने दिल्ली आणि आसपासच्या गावातील लहान मुलांचं अपहरण करुन त्यांचा बळी घेतला. या घटनेमुळे देश हादरला होता. तब्बल २० पेक्षा जास्त लहान मुलांचा यामध्ये बळी गेला होता. यामागची कारणं आणि या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार याचा शोध कसा लागला, याची कहाणी 'सेक्टर ३६' मधून उलगडणार आहे.

टॅग्स :विक्रांत मेसीदिल्लीबॉलिवूडनेटफ्लिक्स