Join us

"करिश्माच्या मुलांना १९०० कोटींची प्रॉपर्टी आधीच दिली गेलीय...", संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:59 IST

प्रियाने कोर्टात असा दावा केला आहे की संजय यांच्या प्रॉपर्टीमधील १९०० कोटी रक्कम आधीच त्याच्या मुलांना देण्यात आली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूचा एक्स पती आणि व्यावसायिक संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या मृत्युपत्रावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून त्यांच्या आई आणि पत्नीमध्ये आधीच वाद सुरू होता. आता यात करिश्मा आणि संजय यांच्या मुलांनीही उडी घेत सावत्र आई प्रिया सचदेव कपूरवर फसवणुकीचा आरोप केला होता. प्रिया सचदेवविरोधात ते कोर्टात गेले होते. आता प्रियाने कोर्टात असा दावा केला आहे की संजय यांच्या प्रॉपर्टीमधील १९०० कोटी रक्कम आधीच त्याच्या मुलांना देण्यात आली आहे. 

करिश्माची मुलं समायरा कपूर आणि किआन कपूर यांनी त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेसंदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायलयाने संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव आणि अन्य काही जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या याचिकेवर न्यायालयाने दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तर संजय कपूर यांच्या संपूर्ण प्रॉपर्टीचा तपशील न्यायालयात मांडण्यासही सांगण्यात आलं आहे. 

करिश्माच्या मुलांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने कोर्टात सांगितलं की त्यांच्या अशीलाला नेहमी हेच सांगितलं गेलं की संजय कपूर यांनी कोणतंच मृत्यूपत्र बनवलेलं नाही. ताज मानसिंह हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीतही हेच सांगण्यात आलं. त्यानंतर अचानक श्रद्धा सूरी यांनी सांगितलं की त्यांच्याकडे संजय कपूर यांचं मृत्यूपत्र आहे. पण, या मृत्यूपत्राची कॉपी मुलांना देण्यात आलेली नाही. याशिवाय यातून मुलांची नावे वगळण्यात आली आहेत. 

संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेवच्या वकिलांनीही कोर्टात त्यांची बाजू मांडली. यावेळी त्यांनी असं सांगितलं की या खटल्याच्या सहा दिवस आधीच मुलांना ट्रस्टकडून १९०० कोटी रुपयांची प्रॉपर्टी देण्यात आली आहे. त्याने असंही सांगितलं की प्रिया संजय कपूर यांची शेवटची पत्नी आहे आणि तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. मृत्यूपत्रात कोणतीच गोष्ट लपवली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 

१२ जून २०२५ रोजी यूकेमध्ये संजय कपूर यांचा अचानक मृत्यू झाला होता. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला की पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. संजय कपूर यांच्या निधनानंतर एका आठवड्याने दिल्लीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यात करिश्मा कपूर आपल्या मुलांसोबत सहभागी झाली होती.

टॅग्स :करिश्मा कपूरसेलिब्रिटी