Join us

आलियाने कौतुक करताच समांथाचे डोळे पाणावले, 'जिगरा'चा ट्रेलर शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 18:19 IST

समांथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलियाचं खुल्या मनाने कौतुक केलं आहे.

स्टारडममुळे आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये असलेली चढाओढ आणि त्यातून एकमेकींवर केली जाणारी कुरघोडी जुन्या काळातील प्रेक्षकांनी पाहिली आहे. मागील काही वर्षांमध्ये स्टारडमची व्याख्या काहीशी बदलली आहे. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये व्यावसायिक चढाओढ असली तरी एकमेकींचे कौतुक करण्याचे कामही अभिनेत्री करताना दिसतात. नुकतंच हैदराबादमध्ये 'जिगरा' सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंट आलिया भट हिने समांथाचे कौतुक केलं. आलियाच्या तोंडून कौतुकाचे शब्द ऐकताच समांथाचे डोळे पाणावल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता समांथाने आलियाची स्तुती केली. 

समांथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलियाचं खुल्या मनाने कौतुक केलं आहे. समांथाने इन्स्टाग्रामवर लिहिलेय की, "आलिया या पिढीतील सर्वात महान अभिनेत्री आहे. तिचा एखादा चित्रपट थिएटरमध्ये असेल तर मी तो चुकवणार नाही आणि तुम्हीही चुकवू नये".  समांथाने आलियाच्या आगामी 'जिगरा' चित्रपटाचा तेलुगू भाषेतील ट्रेलरही शेअर केला आहे. समांथाच्या या पोस्टवर आलियाने हार्ट एमोजी शेअर केले आहेत. 

यापुर्वी आलिया समांथाबद्दल म्हणाली होती की, "सॅम, माझी प्रिय समांथा… तू पडद्यावर आणि पडद्याच्या मागे खऱ्या अर्थाने एक हिरो आहेस. तुझ्या प्रतिभा, खंबीरपणा आणि जिद्दीचा मला खूप आदर आहे पुरुषप्रधान जगात स्त्री म्हणून टिकून राहणे सोपे नाही. परंतु, तू त्या कल्पनांपलीकडे जाऊन तुझ्या प्रतिभेच्या जोरावर सर्वांसाठी आदर्श ठरली आहेस". आलिया पुढे म्हणाली, ठलोक म्हणतात की अभिनेत्री एकमेकींशी स्पर्धा करतात, पण तसं नेहमीच नसतं. आज इथे एक पॅन-इंडिया सुपरस्टार माझ्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी आली आहे, याबद्दल मी खूप आभारी आहे". आलिया आणि समांथामधील बॉन्डिंग पाहून दोघींचे चाहतेदेखील खूश झाले आहेत.  

टॅग्स :समांथा अक्कीनेनीआलिया भटहैदराबाद